घरलाईफस्टाईलगृहिणींनो उद्योजिका व्हा

गृहिणींनो उद्योजिका व्हा

Subscribe

काही दिवसांपूर्वीच आपण जागतिक महिला दिन साजरा केला. यावेळी विविध संस्था, कार्यालये यांच्यातर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. चूल, मूल एवढ्यापुरतेच तिचे जग मर्यादित नसून स्त्रियासुद्धा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असल्याचे आपण आज पाहत आहोत. मात्र, आजही अनेक महिला कर्तृत्ववान असूनही चूल, मूल या भोवतीच आपले जग जगत आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आज जग गतिमान झाले आहे. तेव्हा त्याच्याच आधारे गृहिणींनो तुम्हालाही गती प्राप्त होऊन तुम्हीसुद्धा तुमची सो कॉल्ड गृहिणी ही प्रतिमा पुसून व्यावसायिक गृहिणी अशी प्रतिमा नक्कीच बनवू शकता. यासाठी काय करता येईल ते थोडक्यात.

पाककला – आपली आई, आजी आपल्याला नेहमी सांगत असते की स्वयंपाक करणे हादेखील एक व्यवसाय आहे. आपल्यातील जवळपास सर्वच गृहिणींना उत्तम स्वयंपाक जमतो. अशावेळी आपल्या या कलेच्या साहाय्याने आपण आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो. शहराच्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांतर्फे घरगुती जेवणाचे डबे मागविण्यात येतात. अशा कंपन्यांची माहिती मिळवा. त्यामुळे तुमची पाककला तुम्हाला व्यावसायिक बनण्यास मदत करेल. तसेच विविध प्रकारचे मसाले, लोणची, मुरंबा, पापड सारखे पदार्थही तुम्हाला बनवता येत असल्यास तुम्ही तुमचा स्वतःचा गृहउद्योग सुरू करून व्यावसायिक गृहिणी अशी प्रतिमा नक्कीच बनवू शकता.

- Advertisement -

शिकवणी सुरू करा – उच्चशिक्षित असूनही काही कारणास्तव तुम्ही तुमच्या करिअरपासून दूर आहात तर तुम्ही घरगुती शिकवणी सुरू करून नवे करिअर सुरू करू शकता. असे केल्याने तुमचे मनही रमेल शिवाय तुम्ही स्वावलंबीसुद्धा व्हाल. तसेच हल्ली खाजगी शिकवणीमध्येही काही तासांसाठी शिक्षकांची नेमणूक केली जाते. अशा काही शिकवणींमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवून तुमचा फावला वेळ सत्कारणी लागेल शिवाय तुम्ही कमावत्यासुद्धा बनाल.

ब्लॉगर बना – चूल, मुल सांभाळताना महिलांना अनेकदा व्यक्त होता येत नाही. अशावेळी लिहून व्यक्त होण्याचा सोपा उपाय म्हणजे घर बसल्या ब्लॉगर बनणे. आपल्यापैकी अनेकींना लिहिण्याची आवड असते. तेव्हा विविध विषयांवरील आपणास असलेली माहिती आपण वेबसाईटच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवू शकतो. त्यामुळे आपण व्यक्तही होतोच शिवाय आपल्याला त्यातून रोजगारही उपलब्ध होतो.

- Advertisement -

छंदवर्ग सुरू करा – पाककलेप्रमाणेच गृहिणींचा शिवणकाम, विणकाम, नक्षीकाम, विविध वस्तू बनवण्यात हातखंडा असतो. तेव्हा फावल्या वेळात घरच्या घरी विविध वस्तू तयार करून तुम्ही कमावत्या व्हाल. तसेच तुमच्या कलेचे छंदवर्ग सुरू करूनदेखील तुम्ही रोजगार प्राप्त कराल. असे केल्याने तुम्ही तुमची कला इतरांपर्यंत पोहचवू शकता, शिवाय तुमचा फावला वेळ सत्कारणी लागून तुम्ही स्वावलंबी बनाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -