कंगना रनौतप्रकरणी राज्यपाल सरकारवर नाराज, केंद्राला अहवाल देणार

Governor Bhagat Singh Koshyari not happy on government over Kangana Ranaut case, will report to Center

कंगना रनौतप्रकरणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्या सोबत काल चर्चा केली. कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई आणि सरकारची असलेली भूमिका याविषयी या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं वृत्त आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना राजभवनावर बोलावून कंगना प्रकरणाची माहिती घेतली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईसंदर्भात अहवाल केंद्राला देणार आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावी असं अजोय मेहता यांना राज्यपालांनी सांगितलं. एकंदरीत सुशांतसिंह राजपूत आणि कंगना रनौत प्रकरणामुळे राज्य सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, काल कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईवर आज उच्च न्यायालयात दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे तब्बल २० मिनिट बैठक झाली. मागिल काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्ष शिवसेना यांच्यामध्ये शाब्दिक वाक् यूद्ध सुरु आहे. यामध्ये कुठेतरी सरकारची बदनामी होत असल्याचं चित्र दिसतंय. यानंतर शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्यासोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला असावा. या बैठकीमध्ये सुशांतसिंह प्रकरणात अद्याप काय चौकशी झाली आहे याचा आढावा घेतला. तसंच पुढे हे प्रकरण कसं हाताळायचं याचेही निर्देश शरद पवार देण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – Sushant Singh Case: मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि शरद पवार यांच्यात बैठक