राज्यपालांचे भाजपला आमंत्रण

सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपला पाठवले पत्र, भाजप कोअर कमिटीची आज मुंबईत बैठक

महाराष्ट्रात सुरु असलेला सत्ता स्थापनेच्या संघर्षाची कोंडी लवकरच फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा निकालानंतर १५ दिवस उलटल्यावरही अद्याप सत्ता स्थापनेसाठी कोणीही दावा न केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून विधानसभेत सर्वाधिक जागा मिळविणार्‍या भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापनेचे आमंत्रण देण्यात आले आहे.

नियमानुसार शनिवारी त्यांनी हे आमंत्रण पाठविल्याचे राजभवनाकडून जाहीर करण्यात आले आहे. आता ११ नोव्हेंबर रोजी भाजप सत्ता स्थापनेचा दावा करते का? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, भाजपकडून रविवारी कोअर कमिटीची विशेष बैठक बोलविण्यात आली असून या बैठकीत सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे भाजपचे नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर झाल्यानंतर राज्यात महायुतीला सर्वाधिक १६१ जागा मिळाल्या होत्या. मात्र शिवसेना आणि भाजपत सुरु असलेल्या वादामुळे कोणत्याही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या १५ दिवसांपासून सत्ता स्थापनेचा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे.

त्यातच शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हा पेचप्रसंग अधिकच वाढला आहे. महायुतीसह महाआघाडीचे लक्ष हे राज्यपालांच्या पुढील भुमिकेवर लागून राहिले होते. अखेर राज्यपालांनी नियमानुसार भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. शुक्रवारी महाआघाडीने राज्यपालांकडे अद्याप इतर पक्षांना आमंत्रित का केले नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. अखेर राज्यपालांनी भाजपला आमंत्रित केले आहे.

राज्यपालांनी शनिवारी पाठविलेल्या या आमंत्रणात स्पष्ट केले आहे की, नियमानुसार कोणीही सत्तास्थापनाचा दावा न केल्याने निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकलेल्या भाजप हा पक्ष आहे. त्यानुसार त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनासाठी आमंत्रण दिलेले आहे. तत्पूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सत्ता स्थापनेसाठीच्या सर्व आवश्यक त्या कायदेशीर बाबी तपासून घेतल्या असल्याचे राजभवनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केल्याचे जाहीर केले आहे. नियमानुसार आता देवेंद्र फडणवीस यांना ११ नोव्हेंबर रोजी हा दावा करावा लागणार आहे

काँग्रेस, शिवसेनेच्या गोटात खळबळ
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी रात्री उशीरा भाजपला सत्ता स्थापनाचे आमंत्रण दिल्यानंतर त्याचे पडसाद इतर पक्षांमध्ये उमटले. शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरु झाल्या. मालाड येथील हॉटेलात असणार्‍या आमदारांची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे अनेक नेते मंडळी तातडीने त्याठिकाणी दाखल झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर जयपूरमध्ये असणार्‍या काँग्रेस आमदारांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, बाळासाहेब थोरात आणि विजय वड्डेटीवार हे जयपूरला रवाना झाले आहेत. रविवारी जयपूरमध्ये ते काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा करणार असल्याचे कळते.