संजय काकडेंचे बंड झाले थंड; भाजपमध्येच राहणार

संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांना बारामतीमधून उमेदवारी देण्याची तयारी भाजपा करत असल्याची माहिती मिळत आहे.

Mumbai
sanjay kakde stays back BJP
खासदार संजय काकडे

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची मनधरणी करण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले असून, आज संजय काकडे यांनी आपले पुकारलेले बंड थंड केले आहे. ‘काही स्थानिक मतभेद होते मात्र आता ते मिटले असून, लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्ष जी जबाबदारी देईल ती व्यवस्थीत पार पाडीन’, असे संजय काकडे यांनी सांगितले. आज गरवारे येथे भाजपामध्ये प्रवीण छेडा आणि भारती पवार यांनी प्रवेश केला तेव्हा काही दिवसांपूर्वी नाराज असलेले संजय काकडे देखील व्यासपीठावर मुख्यमंत्र्यासोबत दिसले. दुसरीकडे, ‘संजय काकडे हे भाजपामध्येच आहेत. मध्यंतरी काही कारणाने ते नाराज झाले होते. मात्र, माझी भेट झाल्यावर नानांनी ठरवलं की स्थानिक वाद तिथेच मिटवले जावेत आणि भाजपध्येत राहावे’, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. लोकसभा निवडणुकीसाठी काकडेंनी पश्चिम महाराष्ट्राच्या जागांवर विशेष लक्ष द्यावे, असे त्यांना सांगण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काँग्रेसने त्यांना सपर्क केला असला तरी ते आता भाजपामध्ये आहेत, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

बारामतीतून काकडेंच्या पत्नीला उमेदवारी?

बारामती जिंकण्याची घोषणा भाजपाने केली खरी पण भाजपला उमेदवार मिळत नसल्याने संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांना उमेदवारी देण्याची तयारी भाजपा करत असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे या बारामतीमधून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात उषा काकडेंना उमेदवारीची ऑफरही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

…म्हणून काकडे होते नाराज

भाजपा प्रदेश आणि स्थानिक कार्यालयाच्या कारभाराला कंटाळून, काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या निर्णयावर मी ठाम असल्याचे, काकडे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. तसेच माझी आणि मुख्यमंत्र्यांची मैत्री कायम राहणार आहे. माझे मन इथे रमले नाही म्हणून मी काँग्रेसमध्ये जात असून, मी माझी भूमिका मुख्यमंत्र्यांना सांगितली आहे’, असे खासदार संजय काकडे यांनी या भेटीनंतर सांगितले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here