मुंबईतील दादर, भायखळा भाजीपाला मार्केट सुरू; नागरिकांना दिलासा

देशात लॉकडाऊन असले तरी देखील मुंबईतील दादर, भायखळा भाजीपाला मार्केट सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mumbai
Dadar, Byculla vegetable market will open
भाजी मार्केट (प्रातिनिधीक फोटो)

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले असून या काळात नागरिकांना भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहे. मुंबई शहराला सुरळीतपणे भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी आज मुंबईतील दादर आणि भायखळा मार्केट सुरू करण्यात आले असून, उद्यापासून वाशी येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबई शहरासह राज्यभर भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना केल्या जात असून आज मुंबईतील दादर आणि भायखळा भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. तसेच उद्यापासून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कामकाज नियमित करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि परिसरातील नागरिकांना नियमित भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार आहे.

मालवाहतूक गाड्यांना आडवू नये

शासनाच्या वतीने भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नियोजन करण्यात येत असून भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्यांना पोलिसांनी आडवू नये, त्यांना मार्गस्थ करण्यात यावे, असे आदेश छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहे. याबाबत त्यांनी मुंबई आणि नाशिक पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून माल घेऊन जाणारी आणि त्यानंतर परतणारी रिकामी वाहने पोलिसांनी तात्काळ सोडावी, असे आदेश दिले आहेत. शेतकरी आणि भाजीपाला विक्रेते आणि अन्नधान्य व्यापाऱ्यांनी नागरिकांना जीवनावश्यक माल नियमित उपलब्ध करून द्यावा असे, आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.


हेही वाचा – रक्ताच्या तुटवड्यासाठी छोटी शिबिरं घ्या – राजेंद्र शिगणे


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here