घरमुंबईअकरावी प्रवेशाचा यंदाही उडणार गोंधळ

अकरावी प्रवेशाचा यंदाही उडणार गोंधळ

Subscribe

अकरावी प्रवेशाच्या कट ऑफबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालय अनभिज्ञ

मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असला तरी मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्रवेशाची कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्ध नाही. प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतरही अकरावीसाठी शाखानिहाय नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीचे कट ऑफही पालक आणि विद्यार्थ्यांना न मिळाल्याने यंदाही प्रवेशाचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. तसेच अधूनमधून सर्व्हर डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दहावी परीक्षेचा निकाल कमालीचा घटल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रवेशाचा पेच निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात अकरावी प्रवेशाला विलंब झाला आहे. त्यातच नवनिर्वाचित शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महानगर प्रदेशातील 98 कॉलेजांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय घेत विद्यार्थ्यांना दिलासा देत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली. मात्र शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून विद्यार्थी व पालकांना नव्याने वाढलेल्या जागा व त्या कोणत्या कॉलेजमध्ये वाढल्या आहेत याची माहितीच उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

गेल्या वर्षीचे कॉलेजांचे कट ऑफ पाहून पालक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा निर्णय घेत असतात. परंतु उपसंचालक कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे अद्यापही पालकांना हे कट ऑफ उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. हे कट ऑफ पुढील दोन दिवसांत विद्यार्थ्यांना मिळतील, असे प्रभारी उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्याकडून सांगण्यात आले. एकीकडे कॉलेजांची यादी उपलब्ध होत नसताना प्रवेशाच्या पहिल्या दिवशी सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. मात्र दुसर्‍या दिवशी सर्व्हरमधील बिघाह दुरुस्त केला असला तरी सायंकाळी पुन्हा सर्व्हर डाऊनच्या समस्येला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.

उपसंचालक कार्यालयाकडे नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या कॉलेजांमधील जागांचा तपशीलही उपलब्ध नाही. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी कॉलेजातील जागा वाढविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरही मुंबई विभागाकडे कोणत्या कॉलेजांमध्ये किती जागा वाढणार याची माहिती नसल्याने यंदा प्रवेशाचा बोजवारा उडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी नियुक्त केलेल्या कंपनीकडून माहिती घेऊन कळविण्यात येईल, असे उत्तर अहिरे यांच्याकडून देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -