घरक्रीडाउगाचच संघात बदल करणे टीम इंडियाला महागात पडले!

उगाचच संघात बदल करणे टीम इंडियाला महागात पडले!

Subscribe

भारतीय संघ २०१९ एकदिवसीय विश्वचषक नक्कीच जिंकू शकला असता असे टॉम मूडी यांना वाटते.  

उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धचा सामना १८ धावांनी गमावल्यामुळे इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ एकदिवसीय विश्वचषकातील भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. या पराभवाला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. पावसामुळे दोन दिवस चाललेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर ५० षटकांत २४० धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना भारताची ३ बाद ५ आणि नंतर ६ बाद ९२ अशी अवस्था झाली. महेंद्रसिंग धोनी (५०) आणि रविंद्र जाडेजा (७७) यांनी शतकी भागीदारी करत भारताला सामना जिंकवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोक्याच्या क्षणी हे दोघे बाद झाले आणि भारताचे तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. भारतीय संघ हा विश्वचषक नक्कीच जिंकू शकला असता, पण स्पर्धेआधी उगाचच संघात बदल करणे भारताला महागात पडले, असे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांना वाटते.

भारताकडे खूप प्रतिभावान खेळाडू

तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या खेळाडूंमधील प्रतिभा ओळखण्याची गरज असते. तसेच त्यांच्यातील प्रतिभेचा कसा वापर करता यावर तुम्ही किती यशस्वी होणार हे अवलंबून असते. भारताकडे इतर क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या तुलनेत खूप जास्त प्रतिभावान खेळाडू आहेत. परंतु, कधीतरी याच गोष्टीमुळे त्यांचे नुकसान होते. तुमच्याकडे प्रतिभावान खेळाडूंची संख्या मोठी असल्यास तुम्ही एखाद्या स्पर्धेसाठी योजना आखताना खूप जास्त विचार करता. मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेला एकदिवसीय विश्वचषक हे याचे उत्तम उदाहरण आहे, असे मूडी म्हणाले.

- Advertisement -

खेळाडूंच्या मनात गोंधळ

भारतीय संघ एका वर्षाआधीच या विश्वचषकासाठी तयार होता. मात्र, स्पर्धा सुरु होणार त्याआधी त्यांनी काही चुका करुन जेतेपदाच्या आशा संपवल्या. त्यांनी उगाचच संघात बदल केले, फलंदाजीचा क्रम बदलला, फलंदाज बदलले. त्यामुळे खेळाडूंच्या मनात गोंधळ निर्माण झाला आणि हेच भारताला अखेर महागात पडले. एखादी मोठी स्पर्धा खेळण्याआधी तुम्ही बाहेरील व्यक्तींच्या मताला फारसे महत्त्व देता कामा नाही. तुमच्या योजना तुम्हाला माहित असतात. यशस्वी होण्याआधी तुम्ही जे आधी करत होतात, तेच पुढेही करत राहिले पाहिजे. अन्यथा खेळाडूंच्या मनात गोंधळ निर्माण होतो. आपण संघात राहणार की नाही, अशी भीती त्यांना वाटू लागते. त्यामुळे त्यांची कामगिरी खालावते, असेही मूडी यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -