सिंधूला जेतेपदाची हुलकावणी

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन

Mumbai
Sindhu

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला इंडोनेशिया ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तिने जपानच्या अकाने यामागूचीविरुद्धचा सामना सरळ गेममध्ये गमावला. त्यामुळे सात महिन्यांनंतर जेतेपद पटकावण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले. मागील वर्षी डिसेंबरमध्ये तिने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिला एकही स्पर्धा जिंकण्यात यश आले नाही.

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात २२ वर्षीय यामागूचीने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूचा २१-१५, २१-१६ असा पराभव केला. या सामन्याच्या सुरुवातीला सिंधूला चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे पहिल्या गेममध्ये ती ०-३ अशी पिछाडीवर पडली. मात्र, तिने आपला खेळ सुधारत ७-७ अशी बरोबरी केली आणि मध्यंतराला ११-८ अशी आघाडी मिळवली. यानंतर यामागूचीने दमदार पुनरागमन करत १४-१४ अशी बरोबरी केली. तिने आक्रमक खेळ करून सिंधूला मागून खेळण्यासाठी भाग पाडले आणि याचाच तिला फायदा मिळाला. यामागूचीने पुढील ८ पैकी ७ गुण जिंकत पहिला गेम २१-१५ असा आपल्या खिशात घातला. दुसर्‍या गेममध्येही यामागूचीने सुरुवातीपासून आपले वर्चस्व प्रस्थापित करत ४-१ अशी आघाडी मिळवली. तिने आपला चांगला खेळ सुरू ठेवत मध्यंतराला ११-८ अशी आघाडी मिळवली. सिंधूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत यामागूचीची आघाडी १५-१८ अशी कमी केली. मात्र, यानंतरचे ४ पैकी ३ गुण मिळवत यामागूचीने हा गेम आणि सामना जिंकला. यामागूचीविरुद्धच्या १५ सामन्यांतील सिंधूचा हा पाचवा पराभव होता.

मागील वर्षी सिंधूला जागतिक चॅम्पियनशिप, एशियाड, राष्ट्रकुल स्पर्धा, थायलंड ओपन आणि इंडिया ओपन या स्पर्धांमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यामागूचीचे हे या मोसमातील तिसरे जेतेपद (जर्मन ओपन, आशियाई चॅम्पियनशिप) होते.