शेवटच्या श्वासापर्यंत लढणार!

Mumbai
भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजा

भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजाला यंदाच्या विश्वचषकात अखेरच्या साखळी सामन्यात पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात ४० धावांत १ विकेट घेत उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी संघात स्थान पक्के केले. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात त्याने अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने गोलंदाजीत १० षटकांत अवघ्या ३४ धावा खर्ची करत १ विकेट घेतली.

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओळखल्या जाणार्‍या जाडेजाने २ झेल पकडले आणि रॉस टेलरला अप्रतिमरित्या धावचीत केले. त्यानंतर भारताची ६ बाद ९२ अशी अवस्था असताना त्याने ५९ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. मात्र, तो भारताचा पराभव टाळू शकला नाही. या सामन्यानंतर त्याने चाहत्यांचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले.

कधीही हार मानू नका. पडलात तर पुन्हा जिद्दीने उभे राहा हे खेळाने मला शिकवले आहे. चाहत्यांनी मला दिलेल्या पाठिंब्यासाठी मी तुमचे आभार मानतो. तुमच्या पाठिंब्यामुळे मला चांगला खेळ करण्याची प्रेरणा मिळते. तुम्ही मला असाच पाठिंबा देत राहा आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे वचन देतो, असे जाडेजाने ट्विटमध्ये लिहिले.

जाडेजाप्रमाणेच भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही चाहत्यांचे पाठिंब्यासाठी आभार मानले. मैदानात गर्दी करून सामने पाहायला आलेल्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानतो. तुमच्यामुळे आमच्यासाठी ही स्पर्धा अविस्मरणीय झाली. आम्ही हा (न्यूझीलंडविरुद्ध) सामना शकलो नाही याचे दुःख आहे. आम्ही तुमच्याप्रमाणेच निराश आहोत, असे कोहलीने ट्विटमध्ये लिहिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here