घरताज्या घडामोडीशिवकाळाचा साक्षीदार चंद्रगड उपेक्षित

शिवकाळाचा साक्षीदार चंद्रगड उपेक्षित

Subscribe

घाटातून बैलाच्या लमाणावरून व्यापार चालत असल्यामुळे चंद्रगडावरून या घाटांवर टेहळणी केली जात होती.

शिवकाळाचा ऐतिहासिक वारसा किंबहुना साक्षीदार असलेला तालुक्यातील चंद्रगड तथा ढवळगड आजही पर्यटनदृष्ट्या विकासापासून उपेक्षित असल्याने गडप्रेमी, तसेच शिवप्रेमीही नाराजी व्यक्त करीत आहेत. येथून सुमारे २४ किलोमीटर अंतरावर असलेल्या ढवळे गावाच्या हद्दीत हा किल्ला असून, त्याचा घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिवकाळात त्याचा वापर केला जात होता. या किल्ल्यापासून जवळ सातारा जिल्ह्यातील जावळी खोरे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सरदार चंद्रराव मोरे यांचा पराभव ३१ डिसेंबर १६५५ रोजी केला, त्यावेळी जावळी बरोबरच चंद्रगड आणी कोंढवी किल्ला असे दोन गड स्वराज्यात आले. या टेहळणी गडावरून केवनाळे आणि किणेश्वर या गावातून पार घाटात गाय मुखाच्यावर मिळणारा घाट, क्षेत्रफळ, कुडपण ते महाबळेश्वर तालुक्यातील कुमटे गावा दरम्यानचा ३ किलोमीटरचा घाट आणि काळघाडीचा मार्ग, ढवळे गाव आणि जोर (महाबळेश्वर) गावापर्यंतचा अंदाजे ५ किलोमीटरचा ढवळा घाट, सापळ खिंड, काडेनळीचा घाट अणि मार्ग, हतलोटचा घाट आणि अंबेनळीचा पार घाट इत्यादी स्वराज्याच्या ताब्यात आले.

त्या काळात या घाटातून बैलाच्या लमाणावरून व्यापार चालत असल्यामुळे चंद्रगडावरून या घाटांवर टेहळणी केली जात होती. स्वाभाविक स्वराज्यात या गडाला महत्त्व होते. कालौघात गडावरील तटबंदी आणि बुरूज ढासळले आहेत. गडावर दगडी नंदीची मूर्ती, पाषाणात कोरलेली महादेवाची पिंडी आहे. पाण्याचे टाके आहेत. गडावर ढवळे गावातून जाता येते. गडाची वाट अडचणीची, उभ्या चढाची अणि निसरडी असून, अवघड आहे. गडावर पोहचण्यास दीड तास लागतो.
या परिसरातील शेकडो ग्रामस्थ आणि महिला गडावर श्रावण महिन्याच्या दर सोमवारी येत असतात. येथे पूजाअर्चा आणि ग्रंथ वाचन, तसेच रुद्राभिषेक आदी कार्यक्रम सुरू असतात. महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. येेथील महादेवावर भक्तांची अपार श्रद्धा आहे. आजमितीस पुरातत्त्व विभागाने आणि शासनाने पर्यटनाच्यादृष्टीने गडाच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. येथे येणार्‍या पर्यटकांसाठी सुविधा मिर्माण केल्यास पर्यटक मोठ्या संख्येने येतील, इतके मात्र नक्की!

- Advertisement -

 -बबन शेलार 


हेही वाचा – पवारांचा हुबेहूब आवाजाला वापरले एप, अखेर पोलिसांना सापडलाच

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -