घरठाणेPower Theft: वीजचोरीचा आकडा काढल्याने राग अनावर, दमदाटी करणाऱ्या ग्राहकाला महावितरणचा दणका

Power Theft: वीजचोरीचा आकडा काढल्याने राग अनावर, दमदाटी करणाऱ्या ग्राहकाला महावितरणचा दणका

Subscribe

वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योग जगताकडून वाढलेली वीजमागणी यामुळे महावितरणची सध्याची उच्चतम मागणी २४,००० ते २४,५००  मेगावॅटपर्यंत   नोंदवली गेली आहे. मात्र कोळशाची कमतरता यामुळे वीज निर्मितीत घट झालेली असून आपत्कालीन भारनियमन करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहीत्राची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे. सदर रोहित्रांवर वीजचोरी आढळ्यास संबंधित ग्राहकांविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार कल्याण परिमंडलात गुरुवारपासून वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे.

वीजचोरीसाठी वापरत असलेला आकडा (हूक) काढल्याच्या रागातून वरिष्ठ तंत्रज्ञ व त्यांच्या दोन सहकाऱ्याना शिविगाळ, दमदाटी करणाऱ्या आरोपीविरुद्ध वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडा तालुक्यातील गौरापूर येथे शनिवारी (२३ एप्रिल) ही घटना घडली.

- Advertisement -

भाई महादू खंडागळे (रा. गौरापूर, ता. वाडा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. खानिवली शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ संदीप पाटील हे त्यांचे सहकारी तंत्रज्ञ सचिन जाधव तसेच बाह्यस्त्रोत कर्मचारी अनिल गांगड यांच्यासह गौरापूर येथे वीज चोरांवरिुद्ध कारवाई करत होते. वीज चोरीसाठी लघुदाब वाहिनीवर टाकलेले आकडे काढत असताना आरोपीने वरिष्ठ तंत्रज्ञ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना मारण्याच्या उद्देशाने अंगावर धावून जात शिविगाळ व दमदाटी केली व काम करण्यापासून त्यांना रोखले. वरिष्ठ तंत्रज्ञ पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी भाई खंडागळे याच्या विरूद्ध वाडा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्ह्याची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

शहापूरात ४४१ जणांविरोधात कारवाई 

शहापूर तालुक्यातील वीज चोरट्याविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसात आकडे (हूक) टाकून वीजचोरी करणाऱ्या ४४१ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी वीजचोरीसाठी वापरलेल्या साहित्याची पथकाने होळी केली असून वीज कमतरतेच्या पार्श्वभूमिवर मुख्य कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

- Advertisement -

शहापूर ग्रामीण शाखा कार्यालय अंतर्गत व डोळखांब परिसरात महावितरणच्या पथकाने वीज चोरांविरुद्ध धडक मोहिम राबवली. यात एकूण १०८८ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. वीज कायद २००३च्या कलम १३५ नुसार ३० ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे या तपासणीत आढळून आले. संबंधितांना त्यांनी केलेल्या वीजचोरीचे अनुमानित वीजबिल व दंडाची रक्कम भरण्याबाबत नोटिसा देण्यात येत आहेत. या रकमेचा भरणा न केल्यास त्यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी फिर्याद देण्यात येणार आहे. तर तब्बल ४४१ ठिकाणी वीजवाहक लघुदाब वाहिन्यांवर आकडे टाकून थेट वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. हे आकडे काढून टाकण्यात आले असून वीजचोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कार्यकारी अभियंता राजीव रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार व त्यांच्या टिमने ही कारवाई केली. आगामी काळात ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता कटकवार यांनी दिली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -