IPL 2022: सतत आयपीएल खेळल्यामुळे कोहलीचे फूटवर्क आळशी झाले, अझरुद्दीनचं मोठं वक्तव्य

भारताचा माजी कर्णधार आणि आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून पुढे जात आहे. त्याचा खराब फॉर्म आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामात सुद्धा दिसून आला आहे. कोहली शनिवार सलग दुसऱ्या सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद झाला. अशा परिस्थितीत भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यानंतर आता मोहम्मद अझरुद्दीन यांनीही कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

सध्याच्या हंगामात विराट कोहलीने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १७ च्या सरासरीने केवळ ११९ धावा केल्या आहेत. तर त्याने ४१ आणि ४८ अशा धावांचे त्याने दोन डाव खेळले. याशिवाय त्याला कोणत्याही सामन्यात २० धावांचा टप्पा गाठता आलेला नाहीये. मागील दोन सामन्यांमध्ये कोहलीने एकही खाते न उघडता तो बाद झाला आहे. मागील चार सामन्यांमध्ये कोहलीने फक्त १३ धावा केल्या आहेत.

कोहलीला विश्रांतीची गरज

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला कोहलीवर खूप विश्वास आहे. कारण त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सामने खेळले आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला विश्रांतीची नितांत गरज आहे, असं अनेक लोकांनी म्हटलं आहे. सतत आयपीएल खेळत असल्यामुळे त्याचे फुटवर्क आळशी होत चालले आहे. त्यामुळे मला वाटते की, २ किंवा ३ सामन्यांसाठी त्याला विश्रांतीची नितांत गरज आहे, जर त्याने विश्रांती घेतली तर त्याला स्वत: ला पुन्हा एकदा जिवंत ठेवण्याची संधी मिळेल, असं अझरुद्दीने म्हटलं आहे.

मानसिक थकवा टाळण्यासाठी विराटनं ब्रेक घ्यावा

गेल्या काही दिवसांपूर्वी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला मोलाचा सल्ला दिला होता. गेल्या काही सामन्यांपासून विराट कोहलीचा सूर गवसताना दिसत नाहीये. त्यामुळे कोहलीने दीड-दोन महिने क्रिकेटपासून दूर रहावं. तसेच मानसिक थकवा टाळण्यासाठी विराटनं ब्रेक घ्यावा, असा सल्ला रवी शास्त्री यांनी दिला होता. एकंदरीत आयपीएलमधील विराटच्या निराशाजनक कामगिरीवर रवी शास्त्रींनी मोठं वक्तव्य केलं होतं.

निर्णय घेताना समजूतदारपणा दाखवावा लागतो. कोहलीची अजून ६ ते ७ वर्ष उरली आहेत. त्यामुळे त्याला अशा तणावाच्या स्थितीत गुरफटलेलं पहाणं कोणालाच आवडणार नाही. तो आणखी खचत जाईल. त्याला या अडचणीचा सामना करावा लागेल पण त्यासाठी त्याला वेळ द्यायला हवा, असं रवी शास्त्री म्हणाले होते.

आरसीबीचा हैदराबादकडून पराभव

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी तिसरा सामना गमावला. हा संघ आतापर्यंत ८ पैकी ५ सामने जिंकून चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र, शनिवारी झालेल्या सामन्यात आरसीबी संघ १६.१ ओव्हर्समध्येच ६८ धावांवर गारद झाला. याच संधीचा फायदा घेत हैदराबादने ८ ओव्हर्समध्ये ७२ धावा करत हा सामना जिंकला.


हेही वाचा : Ravi Shastri: मानसिक थकवा टाळण्यासाठी विराटनं ब्रेक घ्यावा, माजी प्रशिक्षकांचं मोठं वक्तव्य