घरताज्या घडामोडीST Workers Strike : एसटीचा संप खासगी वाहतूकदारांच्या पथ्यावर ; प्रवाशांची चाललेयं...

ST Workers Strike : एसटीचा संप खासगी वाहतूकदारांच्या पथ्यावर ; प्रवाशांची चाललेयं सर्रास लूट

Subscribe

प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड

एसटीच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या चांगलाच पथ्यावर पडला असून, त्यांनी दिवाळीची सुट्टी संपवून शहरासह अन्य गावांकडे निघालेल्या प्रवाशांकडून दुप्पट-तिप्पट भाडे वसूल करीत त्यांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे संपकर्‍यांसह शासनाच्या नावाने हे प्रवासी अक्षरशः खडे फोडत आहेत.सोमवार आणि मंगळवारी मुंबई-गोवा महामार्गावर, तसेच इतर मार्गांवरील बस थांबे आणि नाक्यांवर वाहनांची वाट बघत प्रवासी तासन्तास उभे होते. यात वृद्ध आणि महिलांचे खूप हाल झाले. प्रवाशांना अधिकचे पैसे देऊन खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. पाली ते खोपोली फाटा या ३० किलोमीटर अंतरासाठी खासगी वाहने ८० ते १०० रुपये घेत होते. तर खोपोली फाटा ते लोणावळा या अवघ्या ८ ते ९ किलोमीटर अंतरासाठी खाजगी वाहने तब्बल ८० रुपये घेत होते. लांब पल्ल्याच्या ठिकाणी तर भरमसाठ पैसे आकारले जात होते. एका महिलेने सांगितले की, आम्ही गावी जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर वाकण नाक्यावर एसटीची वाट पाहत उभे होतो. मात्र ३ तास थांबून एकही एसटी आली नाही. त्यामुळे अधिकचे पैसे देऊन खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागला.यात पैसे तर गेलेच, पण गैरसोय देखील झाली.

गावागावात जाण्यासाठी अनेकांना मिनीडोअरचा आधार मिळाला. तर लांबच्या पल्ल्यासाठी खासगी वाहने उपयोगी आली. या सर्व गाड्या प्रवाशांनी अगदी खचाखच भरुन जात होत्या. परिणामी खासगी वाहतूकदारांचा धंदा तेजीत होता. त्यांना जणू काही दिवाळीचा बोनस मिळाला. जिल्ह्यातील लांब पल्याच्या काही एसटी गाड्या सुरू होत्या. मात्र त्याही नियोजित स्थळी गेल्यानंतर तेथून पुढे जात नव्हत्या. जवळच्या थांब्यावरील प्रवाशांना देखील घेत नव्हत्या. त्यामुळे या प्रवाशांचे देखील प्रचंड हाल झाले.

- Advertisement -

बस स्थानकांवर गर्दी

ज्यांना या संपाबद्दल माहित नव्हते ते प्रवासी बस स्थानकात आले होते. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. परंतु गाड्याच नाही हे समजल्यानंतर त्यांनी तेथून परतीचा मार्ग पकडला. जो तो मिळेल त्या वाहनांनी नियोजित स्थळी जाण्याचा प्रयत्न करीत होता.

सुट्टी संपल्याने पाली येथून शिरूरला कामावर जाण्यासाठी निघालो. पालीत तब्बल २ तासांनी खोपोली फाट्यावर जाण्यासाठी खासगी वाहन मिळाले. तेथून वाट पाहिल्यानंतर लोणावळ्यापर्यंत खासगी वाहन मिळाले. त्याने खूप पैसे देखील घेतले. त्यानंतर लोणावळ्याला पीएमटीमध्ये बसून पुढील प्रवास केला. ४ तासांच्या प्रवासासाठी तब्बल ९ तास लागले. कामावर पोहचण्यास खूप उशीर झाला. वेळ आणि श्रम तर लागलेच, पण खूप गैरसोय देखील झाली.
-संकेत खंडागळे, अभियंता, पाली

- Advertisement -

कामानिमित्त मुंबईत आलो होतो. एसटी संप असल्याने खूप गैरसोय झाली. त्यात एकच डोस घेतला असल्याने लोकल ट्रेनचा प्रवास करता आला नाही. शासनाने लवकर यावर सकारात्मक तोडगा काढावा.
-अजित मणियार, शिक्षक, पाली


हे ही वाचा – ST Workers Strike : राज्यातील ४५ आगारातील ३७६ कर्मचारी निलंबित; एसटी महामंडळाची मोठी कारवाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -