घरताज्या घडामोडीस्थलांतरामुळे पोलादपुरचं गावपण हरवत चाललयं

स्थलांतरामुळे पोलादपुरचं गावपण हरवत चाललयं

Subscribe

विकासाचा अभाव आणि नियमितपणे ठरून गेलेली नैसर्गिक आपत्ती यामुळे गावांच गावपण हरवत चाललं असून, हळूहळू होणार्‍या स्थलांतर प्रक्रियेमुळे पुढील काही वर्षांत ही गावे ओसाड होण्याची भीती आहे. ३० वर्षांपूर्वी या डोंगराळ तालुक्यात गावे ५०-६० घरांची होती. गावात कुडाच्या माती-शेणाने सारवलेल्या भिंतीची, गवत-पेंढा वापरून शाकारलेली बहुतांशी घरे होती. तर बर्‍यापैकी सधन असलेल्या शेतकर्‍यांची घरे ऐन, किंजळ, साग, फणस या झाडांच्या मजबूत लाकडांपासून बनवलेली होतोडा छाप कौलारू, ओटी, पडवी, माजधर अशा रचनेची होती. घरासमोरील अंगणात तुळशी वृंदावन आणि पांढर्‍या चुन्याने केलेली रंगसफेदी, घराजवळच उभारलेल्या माचावर गवत मोळ्या किंवा पेंढयांचे भारे ठेवलेले असायचे आणि माचाभोवती झाडांच्या पानांचा वापर करून घट्ट बांधलेल्या सलदींचा वापर करून बनविलेला गुरांचा गोठा असायचा.
या गोठ्यांतून बैलजोडी बरोबरच कमी-अधिक गाई, वासरे असे चित्र पहावयास मिळायचे. लहानथोरांनी भरलेल्या घरात दुधदुभत्याचा तोटा नव्हता. घरात भातपिकाने हातेरी कणगी भरलेली असायची. येथील शेतकरी एकमेव पावसावर अवलंबून असूनही भात पीकाबरोबर नाचणी, वरईचे डोंगर शेतीतून पीक घेत होता. शिवाय रताळीसह सर्व प्रकारची कंदमुळेही शेतातून घेत असे. पाऊस संपल्यानंतर बांधावर पेरलेल्या तूर आणि मूग डाळीचे उत्पन्न घेतले जात. त्यामुळे जीवनोपयोगी वस्तुंची ददात नव्हती.

पहाटे गावाच्या देवळात काकड आरतीचे स्वर ऐकू येत. स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर असे गाव, कुटुंबे होती. मात्र मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे १० वर्षांपूर्वी सुतोवाच होताच शहरातील बिल्डर आणि इतर धनदांडग्यांचे लक्ष कोकणाकडे गेले. महामार्ग सुसाट झाला की तळकोकण आणि नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पुणे ही औद्योगिक शहरे हाकेच्या अंतरावर येणार असल्याचे हेरून या चाणाक्षांनी तालुक्यातील डोंगर आणि शेतजमिनी स्थानिक दलालांच्या मार्फत विकत घेतल्या. त्या जमिनींवर फार्म हाऊस, टुमदार बंगले, इमारती उभ्या राहिल्या आणि शेतकरी देशोधडीला लागला. त्यामुळे आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे.

- Advertisement -

गेल्या १०-१२ वर्षांचा मागोवा घेतला तर तालुक्यावर निसर्गाचा प्रकोप होत आहे. दरवर्षी हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला. बारमाही शेतात राबायचे, शेतीसाठी दिवसागणीक खते, औषधे आणि मजुरी असा वाढता खर्च करायचा, त्यानंतर मिळणार्‍या उत्पन्नात पोटाची खळगी कशी भरायची, ही चिंता कपाळी चिकटलेली! अशा कठीण अवस्थेत तरुण मुलांना तालुक्यात उपलब्ध नसलेला रोजगार अशा एक ना अनेक समस्या, संकटांवर रामबाण उपाय म्हणून गावातील घरांना टाळे ठोकत त्यांनी कुटुंबासह शहरांची वाट धरली आहे.
मात्र याकडे केंद्र आणि राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. या दोन्ही सरकारांच्या योजना बासनात गुंडाळून ठेवल्या गेल्या असून, रस्त्यावरच्या विक्रेत्याला पतपेढ्यांपासून खासगी आणि सरकारी बँका कर्ज देतात, मात्र शेतकर्‍याला देत नाहीत. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आग्रही रहावे, असे मत कोतवाल येथील प्रगतीशील शेतकरी बाळू दरेकर यांनी ग्रामस्थांच्यावतीने व्यक्त केले.

                                                                                              वार्ताहर – बबन शेलार 

- Advertisement -

हे ही वाचा – Corona Vaccination: महाराष्ट्राने १० कोटींचा लसीकरणाचा टप्पा केला पार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -