कळवा भागातील पाणी प्रश्न निकाली लागणार, जलवाहिनीसाठी २.४३ कोटींचा निधी मंजूर

कळवा–मुंब्रा–दिवा भागात ४० वर्ष जुनी झालेली पाण्याची मुख्य पाईपलाईन बदलण्याचे काम सुरु आहे. वारंवार जुनी पाईपलाईन फुटणे तसेच नव्या पाईपलाईनच्या कामासाठी शटडाऊन घेत असल्याने दिवा, मुंब्रा आणि दिवा शहरांमध्ये पाणी टंचाईची मोठी समस्या निर्माण होत आहे. हे टाळण्यासाठी ही नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यासाठी मे २०२२ ची मुदत आहे. याचे काम मुदतीत कशा प्रकारे होईल आणि हे काम युद्धपातळीवर पूर्ण करुन हे उद्दिष्ट एक ते दोन महिने आधी म्हणजेच मार्च २०२२ पर्यंत कसे पूर्ण होईल करण्यासंदर्भात यापूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेत सयुंक्त बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत कळवा भागातील पारसिक नगर येथे नवीन जलवाहिनी टाकण्याकरिता महापालिकेकडे निधीची कमतरता भासत असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नवीन जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यास नगरविकास विभागाकडून तातडीने मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता कळवा, पारसिकनगर येथे ८१ मिमी. मृदुपोलादी ७०५ मी. व्यास व लांबीची जलवाहिनी टाकण्यासाठी २ कोटी ४३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा शहरांमधील पाणी टंचाईच्या प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याकरिता कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे नेहमी तत्पर असतात. काही दिवसांपूर्वी २२१ कोटीचा दिवा – मुंब्रा रिमॉडलिंग या प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पातून थेट दिवा शहरात पाणी पुरवठा व्हावा म्हणून कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या पलावा गृह प्रकल्पापासून दिव्यापर्यंत स्वतंत्र ८०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला होता.

त्यापाठोपाठ लगेचच कळवा भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील पारसिकनगर येथील श्री स्वामी समर्थ कॉम्पलेक्स ते अमृतआंगण संप पर्यंत ८१ मिमी. मृदुपोलादी ७०५ मी. व्यास व लांबीची जलवाहिनी टाकण्याकरिता तब्बल २.४३ कोटी निधी महापालिका क्षेत्रातील मुलभूत सोयी सुविधांचा विकास या लेखाशीर्षकाअंतर्गत मंजूर करून घेतला आहे. हे कामे पूर्ण झाल्यावर कळवा आणि दिवा शहरांमधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल, असा विश्वास देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच पाणी पुरवठा प्रश्न लक्षात घेऊन त्वरित निधी मंजूर केल्याबद्दल खा.डॉ. शिंदे आणि कळवा वासियांकडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.


हेही वाचा :  रेल्वे अपघातात पाय गमावणाऱ्या रुणाली मोरेला ठाणे महापालिकेने दिले हक्काचे घर