घरदेश-विदेश'लगान से लगाम तक...' शशी थरूर यांच्या ट्वीटबरोबरच आनंद महिंद्रांचे चर्चिलबाबतचे ट्वीट...

‘लगान से लगाम तक…’ शशी थरूर यांच्या ट्वीटबरोबरच आनंद महिंद्रांचे चर्चिलबाबतचे ट्वीट चर्चेत

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. तमाम भारतीयांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊसच पडत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ‘लगान’ या चित्रपटाचा संदर्भ देत केलेले ट्वीट चर्चेत आहे. तर, प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ देत ट्वीट केले आहे.

जुलै महिन्यात ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यासह 40 जणांनी राजीनामे दिल्याने ते सरकार कोसळले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस विजयी झाल्या होत्या. पण अवघ्या 45 दिवसांतच त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. ब्रिटनच्या इतिहासातील त्या सर्वात कमी कार्यकाळ असलेल्या पंतप्रधान बनल्या. त्यामुळे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एक ट्वीट केले आहे. ‘लगानपासून लगामपर्यंत. केवळ 75 वर्षांत. जय हिंद,’ असे ट्वीट करताना त्यांनी ‘लगान’ या चित्रपटातील अभिनेता आमीर खानच्या फोटोबरोबरच ऋषी सुनक यांचा फोटो वापरला आहे.  त्यांचे हे ट्वीट आज खूप चर्चेत होते.

- Advertisement -

महिंद्रा यांच्या ट्वीटमध्ये चर्चिल यांच्या वक्तव्याचा उल्लेख
प्रसिद्ध उद्योगपती व महिंद्रा अॅण्ड महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा हे देखील कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी देखील ऋषी सुनक यांच्या नियुक्तीबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ऋषी सुनक यांच्याबद्दल केलेल्या ट्वीटमध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्सट चर्चिल यांचे एका वक्तव्याचा उल्लेख केला आहे. 1947मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र होणार होता, तेव्हा त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याची चेष्टा करताना सर्व भारतीय नेत्यांना कमी योग्यतेचे आणि प्रभावहीन असल्याचे म्हटले होते. पण आज आपण स्वातंत्र्याचे 75वे वर्ष साजरे करत असताना ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाची व्यक्ती नियुक्त झाल्याचे आपण पाहात आहोत. आयुष्य खूप सुंदर आहे, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -