घरदेश-विदेशRafale deal : 'चोर एकत्रितपणे चौकीदारला लक्ष्य करत आहेत'

Rafale deal : ‘चोर एकत्रितपणे चौकीदारला लक्ष्य करत आहेत’

Subscribe

राफेल करारामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमित शहा यांनी राहुल गांधींच्या माफीनाम्याची मागणी केली आहे. शिवाय, यावेळी सर्व चोर एकत्र आले असून आता चौकीदारला चोर म्हणत आहेत अशा शब्दात अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केलीआहे.

केवळ राजकीय फायद्यासाठी काँग्रेसनं राफेल करारामध्ये घोटाळा झाल्याचा बेछूट आरोप केले अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. राफेल करारामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. यावेळी अमित शहा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. राफेल करारामध्ये काँग्रेसकडून अपप्रचार करण्यात आला. यावेळी देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील काँग्रेसनं केला. शिवाय, ज्यांनी खोटे आरोप केले त्यांना आजचा निकाल चपराक असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. आजच्या निकालानंतर सत्याचा विजय झाला असून राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी देखील अमित शहा यांनी केली आहे. शिवाय, काँग्रेसनं सैन्याची देखील दिशाभूल केली. दरम्यान, राहुल गांधी यांनी कशाच्या आधारे आरोप केले? असा सवाल देखील अमित शहा यांनी केला. २००७ ते २०१४ या काळात करार पुढे सरकला नाही. उलट काँग्रेसच्या काळात दलालांना प्राधान्य मिळालं. पण, भाजप सत्तेत आल्यानंतर पारदर्शीपणे कराराला अंतिम स्वरूप दिलं, असं देखील यावेळी अमित शहा यांनी म्हटलं.

यावेळी सर्व चोर एकत्र आले असून आता चौकीदारला चोर म्हणत आहेत अशा शब्दात अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. केवळ घाबरून काँग्रेस मोदींवर आरोप करत आहेत असं देखील यावेळी अमित शहा यांनी म्हटलं आहे. तसंच राहुल गांधी यांनी आता बालिशपण सोडून द्यावा. सरकार राफेल करारावरील चर्चेसाठी तयार आहे. शिवाय, चर्चेमध्ये कोणतीही बाधा येणार नाही याची हमी मी देतो अशा शब्दात अमित शहा यांनी विरोधकांना चर्चेचं आव्हान दिलं आहे. पण, काँग्रेसला चर्चेमध्ये रस नसून काँग्रेस चर्चेपासून पळ काढत असल्याची टिका देखील यावेळी अमित शहा यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -