घरदेश-विदेशअंकिता हत्याप्रकरण चिघळले, पुन्हा पोस्टमार्टम करण्याची मागणी करत अंत्यसंस्कारास नकार

अंकिता हत्याप्रकरण चिघळले, पुन्हा पोस्टमार्टम करण्याची मागणी करत अंत्यसंस्कारास नकार

Subscribe

अंकिता हत्याकांडप्रकरणी स्थानिक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसंच, काँग्रेस, वामपंथी संघटना, विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी बदरीनाथ हायवेवर रास्ता रोको केला आहे.

ऋषिकेश – गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अंकिता भंडारी या तरुणीची नदी फेकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिसॉर्टचा संचालक माजी राज्यमंत्र्याचा मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अंकिताचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी एसआडीआरएफला पाचारण केलं होतं. शुक्रवारपर्यंत तिचा मृतदेह सापडला नाही. मात्र, शनिवारी सकाळी तिचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिसांनी मृतदेहावर पोस्टमार्टम केलं आहे. परंतु, अंकिताच्या भावाने पुन्हा एकदा पोस्टमार्टम करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा दिलाय. पोस्टमार्टममध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

पुन्हा पोस्टमार्टम करण्याची मागणी अंकिताच्या भावाने केली आहे. अंतिम अहवाल आल्याशिवाय अंकितावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा इशारा तिच्या भावाने दिला. तसंच, अंकिताच्या हत्येची माहिती मिळताच प्रशासनाने तत्काळ ती हॉटेलच्या ज्या खोलीत राहिली ती खोली तोडली. त्या खोलीत पुरावे असू शकतात. ते पुरावे लपवण्यासाठी खोली तोडली असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे अंकिताच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल येत नाही, तोवर अंत्यसंस्कार होणार नाहीत. दरम्यान, याप्रकरणी विकासखंड पौडीच्या ग्राम पंचायतीतील लोकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

- Advertisement -

या हत्याप्रकरणातील सर्व साक्षी पुरावे मिटवण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियाद्वारे केला जात आहे. या आरोपात तथ्य नसल्याचा दावा अप्पर पोलीस अधिक्षक शेखर चंद्र सुयाल यांनी केलाय. तसंच, याप्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांकडे सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलं. पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजीच या हॉटेलचे व्हिडीओ काढले होते. २३ सप्टेंबर रोजी सकाळीच फॉरेंसिक टीमने अंकिताच्या खोलीत आणि संपूर्ण रिसॉर्टमधील इलेक्ट्रॉनिक आणि वैज्ञानिक पुरावे जप्त केले होते. याप्रकरणी पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत. ज्यामुळे आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होऊ शकते. याप्रकरणी आता पुढील तपास एसआयटी करत असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.

काय आहे प्रकरण

- Advertisement -

पौडी गढवालच्या नांदलस्यू पट्टी येथील श्रीकोट येथे राहणारी अंकिता भंडारी (१९) वनंत्रा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. १८ सप्टेंबरपासून ती बेपत्ता होती. त्यामुळे रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य यांनी तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केली. गुरुवापर्यंत अंकिताचा काहीच पत्ता लागला नाही. यानंतर हे प्रकरण लक्ष्मणझुला पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आलं. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर रिसॉर्टचे मालक आणि व्यवस्थपकांवर पोलिसांचा संशय बळावला. रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना समजलं की, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता अंकिता रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य, व्यवस्थापक अंकित आणि भास्कर यांच्यासोबत रिसॉर्टच्या बाहेर पडले. त्यानंतर जवळपास रात्री दहा वाजता हे तिघेही पुन्हा रिसॉर्टमध्ये पोहोचले. पण अंकिता त्यांच्यासोबत नव्हती. यावरून पोलिसांनी या तिघांनाही चौकशीसाठी बोलावलं.

पोलिसांचा दणका पडल्यावर या तिघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. रिसॉर्टमध्ये येणाऱ्या ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवण्याची सक्ती अंकितावर करण्यात येत होती. अंकिताला हे आवडत नव्हतं. त्यामुळे ती सर्वांना रिसॉर्टमधील प्रकरण सांगायची. हे प्रकरण उजेडात आणण्याची धमकी अंकिता सतत द्यायची. यावरून अंकिताचे वाद सुरू होते. हत्येदिवशी चौघेजण वेगवेगळ्या गाडीने चीला बैराज येथे पोहोचले. यावेळी त्यांनी फास्टफूडसह मद्यप्राशन केलं. त्यानंतर ते असेच पुढे चालत गेले आणि नदी किनाऱ्यावर थांबले. येथे पुलकित आणि अंकिता यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी अंकिताने पुलकितचा मोबाईल खेचून नदीत फेकून दिला. यामुळे पुलकितने संतापून अंकिताला नदीत ढकललं. अंकिताने दोन वेळा पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. पण तिचा प्रयत्न फसला. तिच्या आवाजामुळे इतर तिघेजण घाबरले आणि घाबरून रिसॉर्टमध्ये गेले. त्यानंतर अंकिता आपल्या रुमध्ये असल्याचं त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर, काही वेळाने या तिघांनी राजस्व पोलीस ठाण्यात अंकिता बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर पुलकित आर्य, अंकित आर्य, सौरभ भास्कर यांना अटक करून हत्या, पुरावे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

अंकिता हत्याकांडप्रकरणात स्थानिकांचा आक्रोश आणि विरोधकांची घेराबंदी पाहून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शनिवारी रात्री महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांच्या आदेशानुसार, हे रिसॉर्ट मध्यरात्रीच जमिनदोस्त करण्यात आले. पौडी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी मिळून ही कारवाई केली.

स्थानिक लोक आक्रमक

अंकिता हत्याकांडप्रकरणी स्थानिक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसंच, काँग्रेस, वामपंथी संघटना, विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी बदरीनाथ हायवेवर रास्ता रोको केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -