बलात्कारप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा, २३ वर्षांनी मिळाला पीडितेला न्याय

Asaram Bapu sentenced to life imprisonment | २००१ ते २००६ मध्ये आसाराम बापू आणि त्याच्या मुलाकडून दोन बहिणींवर अत्याचार. २०१३ मध्ये गुन्हा दाखल. २३ वर्षांनी पीडितांना मिळाला न्याय.

asaram bapu

Asaram Bapu sentenced to life imprisonment | अहमदाबाद – स्वयंघोषित संत आसाराम बापूला आणखी एका बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २००१-०६ या पाच वर्षांच्या कालावधीत आसारामच्या आश्रमात असलेल्या दोन बहिणींवर आसारामने सातत्याने बलात्कार केला होता. याप्रकरणी २०१३ मध्ये गुन्हा दाखल झाला. त्यामुळे तब्बल २३ वर्षांनंतर पीडितेला न्याय मिळाला आहे.

२००१ ते २००६ या पाच वर्षांच्या कालावधीत आसाराम बापूने सूरत येथे राहणाऱ्या महिला शिष्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणी ऑक्टोबर २०१३ मध्ये आसाराम बापूसह सात जणांवर बलात्कार आणि अवैधरित्या बंदिस्त ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. तर, २०१४ मध्ये याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. याप्रकरणी सरकारी वकील आर.सी.कोडेकर यांनी सोमवारी म्हटलं की, न्यायालयाने या खटल्याप्रकरणी आसाराम बापूला भारतीय दंड संहिता कलम ३७६ (२) (सी), ३७७ (अप्राकृतिक यौनाचार) आणि अवैध रुपाने बंदिस्त ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

हेही वाचा – Dead Body In Ashram : आसाराम बापूच्या आश्रमात सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; पोलिसांकडून आश्रम सील

बलात्कार, अनैसर्गिक संबंध, गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे आदी आरोप आसाराम बापूवर ठेवण्यात आले आहेत. तसंच, आसाराम बापूच्या पत्नी आणि मुलीवरही असेच आरोप करण्यात आले होते. परंतु, पुराव्यांअभावी त्यांना निर्दोष सोडण्यात आले आहे. तर, आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याच्याविरोधातील गुन्हा सिद्ध झाला आहे. दोघांवरही बलात्कार, लैंगिक अत्याचार, बंदिस्त करून ठेवण्यासारख्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आसारामविरोधातील तक्रारी अहमदाबादच्या चांदखेडा पोलीस ठाण्यात स्थलांतरीत करण्यात आल्या. कारण या घटना तेथील आश्रमात घडल्या होत्या.

२०१३ मध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूरच्या सत्र न्यायालायने आसारामला २०१८ मध्येच आजन्म कारावसाची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे सध्या तो जोधपूरच्या तुरुंगात आहे. आता त्याच्यावरील बलात्काराचा आणखी एक गुन्हा सिद्ध झाला आहे. या गुन्ह्यामुळेही त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. म्हणजेच, त्याचं संपूर्ण आयुष्य आता तुरुंगातच घालवावं लागणार आहे.

कोण आहे आसाराम बापू

आसाराम बापूला कधीकळी आध्यात्मिक गुरू म्हणून लोकमान्यता मिळाली होती. देशभरात त्याचे असंख्य भक्त होते. आसुमल थाऊमल सिरुमलानी असं त्याचं खरं नाव आहे. आसाराम बापू याचा जन्म सिंध प्रांतातील नवाब जिल्ह्यातील बेरानी या लहानशा खेड्यात झाला. त्याच्या जन्मावेळी एका पाळण्यावाल्याला साक्षात्कार झाला होता. या गावात कोणीतरी संत जन्म घेणार असल्याचा तो साक्षात्कार होता. तेव्हापासून आसाराम बापूची अख्यायिका सांगितली जाते. मात्र, त्याने अनेकींवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले आहेत.