पॅन्डोरा पेपर लिकप्रकरणी केंद्राचे चौकशीचे निर्देश

पॅन्डोरा पेपर लिकप्रकरणी केंद्र सकारने सोमवारी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. पॅन्डोरा पेपर लिकमध्ये भारतासह जगभरातील राजकीय नेते, उद्योगपती आणि सेलिब्रेटींची गुप्त संपत्ती आणि त्यांनी केलेली अनधिकृत गुंतवणूक उघडकीस आणली आहे. त्यात माजी क्रिकेटपटू,राजकीय नेते आणि प्रसिद्ध उद्योगपती यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.

ही चौकशी केंद्र सरकारच्या अनेक संस्थांचा एक गट करणार आहे. या गटाचे प्रमुख केंद्रीय थेट कर बोर्डाचे अध्यक्ष असणार आहेत. या गटात केंद्रीय थेट कर बोर्ड, अंमलबजावणी संचालनालय (ईडी), रिर्झव्ह बँक ऑफ इंडिया, आर्थिक गुप्तचर विभागाचे प्रतिनिधी असणार आहेत, असे कर प्राधिकरणाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी सांगितले.

संबंधित चौकशी संस्थेकडून या प्रकरणात तपास करण्यात येणार आहे. जर कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कायद्यानुसार, योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. संबंधित करदात्यांबाबत माहिती मिळवण्यासाठी परदेशातही संपर्क साधण्यात येईल, असेही केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काय आहे पॅन्डोरा पेपर?

पॅन्डोरा पेपर हा शोधपत्रकारिता करणार्‍या जगभरातील पत्रकारांचा एक गट आहे. हे पत्रकार शोधपत्रकारिता करून माहिती मिळवतात. ती माहिती पेपर्सच्या स्वरूपात असते. ती उघडकीस आणल्यावर त्याला पॅन्डोरा पेपर लिक असे म्हटले जाते. या शोधपत्रकारिता करणार्‍या पत्रकारांच्या गटाला फोर्ड फाऊंडेशन आणि उद्योगपती जॉर्ज सोरोस ओपन सोसायटी फाऊंडेशनकडून निधी पुरवला जात असल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे पॅन्डोरा पेपर लिकमध्ये एकाही अमेरिकन अथवा चिनी व्यक्तीचे नाव नाही.