घरCORONA UPDATEChewing Gum रोखणार कोरोनाचा संसर्ग, धोका ९५ टक्क्यांनी टळणार

Chewing Gum रोखणार कोरोनाचा संसर्ग, धोका ९५ टक्क्यांनी टळणार

Subscribe

जगभरातील १४ हून अधिक देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे नवं संकट उभे राहिले आहे. यात बहुतांश देशांनी सतर्कता बाळगत परदेशी प्रवाशांवर निर्बंध आणण्यास सुरुवात केलीय. तर दुसरीकडे कोरोनावर उपचार करण्यासाठी आजही अनेक शास्त्रज्ञ औषध तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोरोनावर लवकरात लवकर प्रभावी औषधं उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त होतेय. अशा परिस्थिती आता कोरोनाला रोखण्यासाठी च्युईंग गमची मात्रा प्रभावी ठरत असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेल्या एक संशोधनात च्युईंग गम कोरोना संगर्गापासून बचाव करण्यासाठी प्रभावी ठरतोय असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. हे च्युईंग गम तोंडातील कोरोनाचे पार्टीकल्सला ट्रॅप करु शकतात. यामुळे तोंडातील ९५ टक्के कोरोना पार्टीकल्स हे च्युईंग गम चघळल्याने ट्रॅप होऊ शकत आहेत. याचा फायदा म्हणजे कोरोनाचा फैलाव मोठ्याप्रमाणात रोखता येतो. असा दावा संशोकांनी केला आहे.

- Advertisement -

एका अभ्यासानुसार, हे च्युईंग गम एखाद्या जाळीप्रमाणे काम करते. जाळीच्या मदतीने जशी एखादी गोष्ट, वस्तू पकडता येते त्याचप्रमाणे हे च्युईंग गम चघळून तोंडातील कोरोनाचे पार्टीकल्स अर्थात छोटे विषाणू पकडता येतात. या च्युईंग गमच्या मदतीने थुंकीतील कोरोनाचे पार्टीकल्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्यापासून वाचता येईल, कारण संसर्ग झालेली व्यक्ती जेव्हा बोलते, श्वास घेते किंवा खोकते तेव्हा तिच्या तोंडावाटे किंवा नाकावाटे विषाणूचे छोटे थेंब हवेत पसरतात. या हवेतील कोरोनाचे विषाणू आपल्या शरीरात येण्याचा सर्वाधिक धोका असतो. मात्र या च्युईंग गममुळे अशापद्धतीने पसरणाऱ्या संसर्गावर नियंत्रण मिळवता येऊ शकते असा दावा संशोधकांना केला आहे.

या कोरोनाविरोधी च्युईंग गममध्ये एसीईटू प्रोटीन असतात. हे प्रोटीन्स आपल्या शरीरातील पेशींवर आढळतात. मात्र कोरोनाचे विषाणू या पेशींनाही संक्रमित करतात. मात्र या संशोधनात असे दिसले की, कोरोना विषाणूच्या संसर्गास कारणीभूत घटक या च्युईंग गममधील एसीईटूला चिकटतात तेव्हा तोंडातील विषाणूंचा व्हायरल लोड कमी होतो म्हणजेच काय तर संसर्ग होण्याची क्षमता कमी होते. जेव्हा या चघळलेल्या च्युईंग गमच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली तेव्हा यातील व्हायरल लोड जवळपास ९५ टक्क्यांनी कमी झालेला पाहायला मिळाला.

- Advertisement -

पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील एका रिसर्च टीमने मॉड्युलर थेरपीच्या अहवालात या कोरोनाविरोधी च्युईंग गमची माहिती दिली आहे. या अहवालात त्यांनी म्हटले की, या च्युईंग गमची चव ही सर्वसामान्य च्युईंग गमप्रमाणेच असणार आहे. सर्वसामान्य तापमानातही हे च्युईंग गम स्टोर करता येईल. या च्युईंग गम चघळल्याने एसीईटू प्रोटीनचे फारसे नुकसान होत नाही. उलट लाळेतील विषाणूचा व्हायरल लोड कमी करण्यास मदत होते. शिवाय हे च्युईंग गमच्या चघळण्याने थुंकीवाटे पसरणारे कोरोनाचे विषाणू नियंत्रणात आणण्यास मदत होईल.

त्यामुळे कोरोनाविरोधी लसींसोबत हे च्युईंग गमही रुग्णांसाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे ज्या देशांमध्ये कोरोनाविरोधी लस उपलब्ध झाल्या नाहीत अशा देशांमध्ये हे च्युईंग गम अधिक फायदेशीर ठरु शकते असा दावा संशोधकांनी केला आहे. मात्र हे च्युईंग गम अद्याप विक्रीसाठी उपलब्ध झालेले नाही, असेही संशोधकांनी म्हटलेय.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -