घरक्रीडाCovid-19 : ऑस्ट्रेलियातही कोरोनाचा धोका! मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड नवा हॉटस्पॉट

Covid-19 : ऑस्ट्रेलियातही कोरोनाचा धोका! मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड नवा हॉटस्पॉट

Subscribe

मेलबर्नमध्ये मागील तीन दिवसांमध्ये १५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे व्हिक्टोरिया राज्याने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडला (MCG) कोरोनाचा नवा हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले आहे. हे स्टेडियम असलेल्या भागात सहा नव्या कोरोनाबाधितांची नोंद असून या स्टेडियममध्ये सामना पाहिलेल्या हजारो फुटबॉल चाहत्यांना क्वारंटाईन होण्याचे आदेश ऑस्ट्रेलियन सरकारने दिले आहेत. रविवारी या मैदानावर ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीगचा (AFL) सामना पार पडला आणि हा सामना पाहण्यासाठी २३ हजार ४०० प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. यापैकी एकाला आता कोरोनाची बाधा झाल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून एमसीजी मैदान कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात

मेलबर्नमध्ये मागील तीन दिवसांमध्ये १५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने स्थानिक प्रशासन आणि सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मेलबर्नमध्ये नव्या कोरोना हॉटस्पॉट्सची यादी जाहीर करण्यात आली असून यात सुपरमार्केट्स, विविध कॅफे, पब्स यांच्यासह एमसीजी मैदानाचा समावेश आहे.

- Advertisement -

मास्क घालणे बंधनकारक

व्हिक्टोरिया राज्याने मंगळवारी अनेक लोकांनी एकत्र जमण्यावर काही निर्बंध घातले आहेत. तसेच हॉटेल, रेस्टोरंट आणि अन्य काही ठिकाणी जाताना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. हे सर्व निर्बंध ४ जूनपर्यंत असणार आहेत. त्याचप्रमाणे मेलबर्नहून येणाऱ्यांसाठी न्यूझीलंडने कोणताही क्वारंटाईनचा कालावधी ठेवला नव्हता. परंतु, आता या निर्णयाला तीन दिवसांसाठी स्थगिती देण्यात आली आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -