घरदेश-विदेशगुंड विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार

गुंड विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार

Subscribe

कानपूरमध्ये आठ पोलिसांचे हत्याकांड घडवून आणणारा कुख्यात गँगस्टर विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे. एन्काऊंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या विकासला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे पोलिसांनी त्याला मृत घोषित केले. गेल्या काही दिवसांपासून विकास पोलिसांना गुंगारा देत होता. संपूर्ण उत्तर प्रदेशात पोलिसांकडून त्याचा शोध घेतला होता. अखेर काल मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधून त्याला अटक झाली.

एसटीएफच्या गाडीमधून पोलीस विकासला कानपूरला नेत होते. त्यावेळी गाडीला अपघात झाला. त्यानंतर विकासने पोलीस अधिकार्‍याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस आणि विकास दुबे यांच्यात चकमक सुरू झाली. त्यात विकाससह काही पोलीसदेखील जखमी झाले. त्यांना कानपूरमधल्या लाला लजपत राय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

- Advertisement -

साडेसहाच्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला. गाडीचा अपघात पाहून काही लोक घटनास्थळी पोहोचले. मात्र गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने ते तिथून निघून गेले. पोलिसांची कार अतिशय वेगात असल्याने तिला अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. एन्काऊंटर आणि अपघातात काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

कार बदलली?
विकास दुबे याला अटक केल्यानंतर पोलीस त्याला ज्या गाडीतून घेऊन जात होते ती गाडी टाटा सफारी स्टॉर्म ही गाडी होती. अनेक वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी या गाडीच्या मागून जात होते. त्यांना पोलिसांनी रोखवल्यावर काही वेळाने अपघात झाला. मात्र पोलीस दावा करतात त्यानुसार, ज्या गाडीत दुबे बसला होता आणि ती पलटी झाली ती गाडी महेंद्र टीयुव्ही ३०० आहे. त्यामुळे पोलिसांनी विकास दुबे याला घेऊन जाताना गाडी बदलली का, असा सवाल उपस्थित होत आहे.

- Advertisement -

सरकार पलटी होण्यापासून वाचले – अखिलेश यादव
विकास दुबे ठार झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली, असे म्हणत योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कार पलटी झाल्यावर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला हे स्पष्टीकरण संभ्रमात टाकणारे आहे. पळून जायचे होते तर त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन का केले?, कार पलटी झालेली नाही तर सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यासाठी हा सर्व प्रकार घडवून आणला आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

गुन्हेगारांना संरक्षण देणार्‍यांचे काय -प्रियंका गांधी
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत विकास दुबे एन्काऊंटरवर सवाल उपस्थित केला आहे. गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणार्‍याचे काय?, असे प्रियंका यांनी म्हटले आहे. याआधीही त्यांनी गुरुवारी याबाबत एक ट्विट केले होते. कानपूर हत्याकांडमध्ये उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड अलर्ट राहून काम करणे अपेक्षित होते; पण ते अपयशी ठरले. अलर्ट असूनही आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचला, असे त्यांनी म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -