धक्कादायक हॉस्पिटलमधून पळालेल्या कोरोना रूग्णाचा फुटपाथवर मृत्यू

स्थानिक रहिवाशांच्या व्हिडिओमुळे प्रकार उजेडात

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यातच डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयातून पळून गेलेल्या कोरोनाबाधित रूग्णाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा रूग्ण रूग्णालयाच्या शेजारीच फूटपाथवर झोपलेला आढळून आला. मात्र तेथेच त्याचा मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिकांनी व्हिडिओ केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

गुरूवारी रात्रीच्या सुमारास एक व्यक्ती रूग्णालयाबाहेरील फुटपाथवर झोपलेल्या अवस्थेत आढळून आला होता. स्थानिक नागरिकांनी या व्यक्तीला कुठून आला याबद्दल विचारण्याचा प्रयत्नही केला; पण, त्याची बोलण्याचीही स्थिती नव्हती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी रूग्णालय प्रशासन व पोलिसांना ही माहिती दिली. मात्र तीन तास होऊनही रूग्णालयातील कर्मचारी त्या ठिकाणी फिरकले सुध्दा नाहीत.

त्या व्यक्तीची ओळख पटावी यासाठी स्थानिक रहिवाशांनी त्याचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. अखेर तीन तासांनंतर शास्त्रीनगर रूग्णालयातील कर्मचारी या व्यक्तीला रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर या रुग्णाला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. मात्र हा रुग्ण रुग्णालयातून पळून गेला होता, असे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. याआधीही शास्त्रीनगर रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्ण पळून गेल्याचे प्रकार घडले होते.

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० हजारांच्या वर गेली आहे. ५ हजार रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये ५७ बेडचे कोविड सेंटर आहे. मात्र ते रुग्णांनी भरलेले आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आणि श्वास घेण्यास त्रास होत असलेले रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याची संख्या वाढत आहे.

रिकामे बेड उपलब्ध नसल्याने या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी रुग्णालयाच्या कानाकोपर्‍यात जिथे जागा मिळेल तिथे रुग्णांना बसवून त्यांना ऑक्सिजन लावले जात आहे. पालिकेच्या कर्मचार्‍यांना देखील खाटा मिळत नसून या कर्मचार्‍यांना देखील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर, पॅसेजमधील कठड्यावर बसवून ऑक्सिजन लावले जात आहेत. मात्र रूग्णालय प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ठाणे वागळे इस्टेट भागातही एका कोरोना रुग्णाचा वेळीच रुग्णवाहिका न मिळाल्याने रस्त्यावर मृत्यू झाल्याची घटना 20 मे रोजी घडली होती. अ‍ॅम्ब्युलन्स चालकाकडे पीपीई किट नसल्यामुळे तो रुग्णाला हात लावण्यास भीत होता. त्यामुळे या रुग्णाला वेळीच अ‍ॅम्ब्युलन्समध्ये दाखल केले नाही. त्यामुळे या रुग्णाचा उपचाराअभावी रस्त्यातच मृत्यू झाला.