नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा कमालीच्या सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर इंडिया आघाडीतील विरोधी नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या घरांवर छापेमारी होताना दिसत आहे. आम आदमी पार्टीचे मतियाला येथील आमदार गुलाब सिंह यादव यांच्यासह बीआरएस नेत्या आणि तेलंगणाच्या माजी मुख्यमंत्री के. कविता आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे माजी खासदार महुआ मोईत्रा यांच्या घरी छापे आज सकाळी छापेमारी करण्यात आली. (ED extremely active Raids on houses of opposition leaders along with their families)
हेही वाचा – ED : ईडी कमालीची सक्रीय; विरोधी नेत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या घरांवर छापेमारी
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (AAP) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर ईडीचे पथक पहाटे 3.30 वाजता घूमनहेरा येथील आपचे आमदार गुलाब सिंह यादव यांच्या घरी पोहोचले. गुलाब सिंह यादव यांची चार तास चौकशी केल्यानंतर पथक निघून गेले, मात्र त्यांच्या घराबाहेर सध्या पोलीस तैनात आहेत. गुलाब सिंह यादव यांना 2016 मध्ये कथित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र आज ईडीने कोणत्या प्रकरणात कारवाई केली, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
के कविता यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापेमारी
दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेल्या के. कविता यांचा त्रास कमी होताना दिसत नाही. ईडीने के कविता यांच्या नातेवाईकांच्या दोन घरांवर छापे टाकले आहेत. ईडीच्या पथकाने के. कविता यांच्या भावाच्या पत्नीच्या घरावर छापे टाकले असल्याचे समोर येत आहे. हैदराबादमध्ये हा छापा टाकण्यात आला आहे. के. कविता आधीच ईडीच्या ताब्यात असून त्यांची सतत चौकशी केली जात आहे. ईडीने 15 मार्च रोजी के. कविता यांना अटक केली होती. त्यांच्या सात दिवसांच्या कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांची कोठडी 26 मार्चपर्यंत वाढवली आहे.
हेही वाचा – MVA : ईडी-सीबीआयचा वापर ही भाजपची निवडणूक तयारी; थोरातांनी सांगितले, 2029 ची निवडणूक कशी होणार
महुआ मोईत्राच्या अनेक ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी
तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध सीबीआयने गुरुवारी लोकसभेत पैशाच्या संदर्भात प्रश्न विचारल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता. यानंतर आता दोन दिवसांनी त्यांच्या अनेक ठिकाणांवर आज सकाळपासूनच सीबीआय छापेमारी करताना दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सीबीने पश्चिम बंगालसह महुआ मोईत्रा यांच्या 7 ठिकाणांवर छापेमारी केली आहे.