अदानी प्रकरणात विरोधी पक्षनेत्यांनी लिहिले ईडीला पत्र

अदानी मुद्द्यावरून विरोधक आता केंद्र सरकारला वेठीस धरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अदानी प्रकरणावरून आता 16 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईडीच्या संचालकांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये विरोधी पक्षनेत्यांकडून स्वाक्षरी देखील करण्यात आली आहे.

Opposition leaders write letter to ED in Adani case

अमेरिकेच्या हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समुहावर मोठे संकट आले असल्याचे दिसून येत आहे. तर अदानी प्रकरणावर विरोधी पक्ष देखील शांत होण्याचे नाव घेत नसून, सरकारवर सातत्याने आरोप करत आहेत. यामुळे अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) संचालकांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंगसह भ्रष्ट कारवायांच्या आरोपावरून अदानी समूहाविरुद्ध तपास सुरू करण्याची मागणी तपास यंत्रणेकडे करण्यात आली आहे.

ईडीला लिहिलेल्या पत्रात विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे की, अलीकडच्या काळात ईडी कथित राजकीय पक्षांच्या प्रकरणांचा पाठपुरावा कसा करत आहे हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. ज्यामध्ये SEBI आणि CBI सह समवर्ती अधिकार क्षेत्र सामायिक करणे देखील समाविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या आयोगाच्या मर्यादित अधिकारांमध्ये बदल करता येणार नाही हे सुद्धा आम्हाला माहीत असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे. ईडी हे कोणत्याही कारणास्तव त्यांचे अधिकारक्षेत्र बदलू किंवा माफ करू शकत नाहीत, असे देखील आम्हाला माहित असल्याचे विरोधकांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे.

ईडी संचालकांनी चौकशी करण्याची विरोधकांची मागणी
हे सर्व पाहता अदानीवर असलेल्या आरोपांवर त्वरित कारवाई करण्याची विनंती करतो, असे विरोधकांनी या पत्रात लिहिले आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांत अदानी समूहाविरुद्ध अनेक महत्त्वाचे पुरावे सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. असे असतानाही अंमलबजावणी संचालनालयाने अद्याप या गंभीर आरोपांची प्राथमिक चौकशीही सुरू केलेली नाही, अशी माहिती या पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

विरोधकांचा आरोप
या प्रकरणात कॉर्पोरेट फसवणूक, राजकीय भ्रष्टाचार, फसवणुकीद्वारे स्टॉक-किंमत फेरफार आणि एकाच कॉर्पोरेट गटाच्या फायद्यासाठी सार्वजनिक संसाधनांचा गैरवापर/मक्तेदारी असे गंभीर आणि दूरगामी आरोप असल्याचा आरोपही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला. तर अदानी समूहाच्या कंपन्यांवर “कृत्रिमपणे स्टॉक व्हॅल्यूएशन वाढवण्याचा” आरोप विरोधकांनी या पत्राच्या माध्यमातून केला आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शेअर केले पत्र
हे पत्र काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही ट्विटरवर शेअर केले आहे. त्यांनी हे पत्र ट्विटरवर शेअर करताना लिहिले आहे की, अदानी प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणारे 16 विरोधी पक्ष नेते आणि खासदार यांचे सही असलेले पत्र हे ईडीला मेल करण्यात आले आहे. कारण हे पत्र ईडीकडे सुपूर्द करण्यासाठी जात असताना विरोधकांना दुपारी ईडी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी थांबविण्यात आले.

ईडी हे त्यांचे अधिकार क्षेत्र सोडू शकत नाहीत असे ईडीचे संचालक एसके मिश्रा यांना लिहिलेल्या पत्रात विरोधी पक्षांनी तपास यंत्रणेला सांगितले आहे. दरम्यान या पत्रावर काँग्रेस, CPI, CPI(M), JDU, SS (UBT), RJD, DMK, JMM, AAP, IUML, VCK, केरळ काँग्रेस आणि इतर नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जेपीसीच्या मागणीवर विरोधक ठाम
अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्ष जेपीसीची मागणी करत आहेत. सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधी पक्ष अदानींच्या मुद्द्यावरून आवाज उठवत आहेत. तर लंडनमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे संसदेचे कामकाज देखील सुरू राहू शकत नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, अदानी प्रकरणाला काँग्रेसकडून आता जोरदार विरोध करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करत असून देशभरात निदर्शने देखील करण्यात येत आहेत. अदानी प्रकरणाच्या निषेधार्थ विविध राज्यांतील काँग्रेस समित्या निषेध मोर्चे काढत आहेत. त्याचवेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुद्धा संसदीय कामकाज सुरू झाल्यापासून सभागृहात मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधला आहे.


हेही वाचा – किसान सभा मोर्चाच्या शिष्टमंडळाशी दादा भुसे, अतुल सावे करणार चर्चा