आमदार, खासदारांना पेन्शनची गरज नाही, मलाही नको–बच्चू कडूंची ऱोखठोक भूमिका

८० टक्के आमदार, खासदारांना पेन्शनची गरज नाही, मलाही नको अशी भूमिका आमदार बच्चू कडू यांनी मांडली आहे. तसेच याप्रकरणी आजच शासनाला पत्र पाठवतो असेही ते म्हणाले आहेत.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. याचा फटका सरकारी कार्यालये, पालिका , शाळा, शासकिय कार्यालयाबरोबरच सरकारी रुग्णालयांनाही बसला असून आमदार खासदारांच्या वाढीव पगार आणि पेन्शनवरूनही सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यावर आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केले असून सरकारी कर्मचाऱ्यांची बाजू घेत त्यांनी ८० टक्के आमदार, खासदारांना पेन्शनची गरज नाही, मलाही नको अशी भूमिका मांडली आहे. तसेच याप्रकरणी आजच शासनाला पत्र पाठवतो असेही ते म्हणाले आहेत.

राज्यभरातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले असून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची त्यांची मागणी आहे. तसेच एकीकडे आमदार खासदाराला पेन्शन मग आम्हाला का नाही असा सवालही कर्मचारी करत आहे. यावर बोलताना बच्चू कडू यांनी आमदारांना मिळणाऱ्या वाढीव पगारालाही विरोध केला आहे. ज्या आमदारांची कोट्यवधीची संपत्ती आहे. जे कोट्यवधी रुपयांचा आयकर भरतात त्यांना पगारवाढीची आणि पेन्शनची गरज नाही. अशी भूमिका बच्चू कडू यांनी विधानसभेत मांडली.

तसेच यावेळी ते म्हणाले की काही सरकारी कर्मचाऱ्यांना एक ते दीड लाख पगार आहे. तर अंगणवाडी सेविका पाच हजारात काम करत आहेत. खालच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. प्राध्यापकाला दोन, जिल्हाधिकाऱ्याला अडीच आणि आमदाराला तीन लाख पगार आहे. ही विषमता आहे. यामुळे पगार हे कौशल्य आणि श्रमावरच होणं अपेक्षित आहे. तसेच यावेळी त्यांनी जर आमदार खासदारांनी पेन्शन सोडल तर तुम्हीही सोडणार का असा सवाल कर्मचाऱ्यांना केला.