घरदेश-विदेशपूरस्थितीच्या पाहणीसाठी पंतप्रधान मोदी केरळच्या दौऱ्यावर

पूरस्थितीच्या पाहणीसाठी पंतप्रधान मोदी केरळच्या दौऱ्यावर

Subscribe

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३२४ जणांचा बळी गेला. आतापर्यंत २ लाख नागरिकांना याचा फटका बसला असून बरेच नागरिक बेघर झाले आहेत. पूरामुळे राज्यात हजारो कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांच्या पाहणी करता आज पंतप्रधान केरळ राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

केरळमध्ये पावसाचा हाहाकार सुरुच आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर होऊ लागली आहे. केरळमध्ये गुरुवारी एका दिवसात राज्यात कोसळणाऱ्या पावसामध्ये अनेक जणांचा बळी गेला आहे. आता पर्यंत केरळमधील मृतांची संख्या ३२४ पर्यंत झाली आहे. या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केरळ गाठले असून सध्या ते कोची या ठिकाणी पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. काल रात्री केरळ येथील तिरुवनंतरपुरम विभागाचा दौरा त्यांनी केला. तेथील परिस्थीचा आढावा घेऊन आज सकाळी कोची विमानतळावर नरेंद्र मोदी पोहचले. पुरग्रस्तांसाठी अन्न आणि औषधांची मदतही मोदींतर्फे केली जाणार आहे. कोची येथे सध्या पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

- Advertisement -


केरळच्या १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार

केरळच्या पावसाने रौद्ररुप घेतले आहे. डोळे झाकून झोडपणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळच्या १४ जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार केला आहे. तर मुन्नर, वायनाड, कोझिकोडे, पलक्कड, एर्नाकुलम, थ्रिसूर या भागांची सर्वाधिक वाईट परिस्थिती झाली आहे. तर या राज्यातील २ लाख नागरिकांना सुरक्षितेसाठी हलवण्यात आले आहे. लष्कर, हवाई दल तसेच नौदलाचे बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. यासाठी २३ हेलिकॉप्टर आणि २०० बोटी देखील तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील अनेक खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील ऑक्सिजनच्या सिलिंडरच्या तुडवड्यामुळे रुग्णसेवेत देखील बाधा येऊ लागली आहे. अनेक घरांमध्ये १५ फूटांपर्यंत पाणी साठल्याने हेलिकॉप्टरद्वारे अन्नपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर केरळ सरकारला आंध्र प्रदेशने १० कोटी आणि तेलंगणा सरकारने २५ कोटींची मदत जाहीर केली आहे.

नद्यांनी पाणीपातळी ओलांडली

केरळमधील काही जिल्ह्यात अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अलाप्पुझा, एर्नाकुलम, पथनमतित्ता आणि त्रिशूर या जिल्ह्यांतील पूरस्थिती अतिशय बिकट झाली आहे. पंपा, पेरियार आणि चालाकुडी नद्यांनी पाणीपातळी ओलांडली असल्याची माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे. तसेच केरळमधील १०० वर्षांतील हा सर्वात भयानक महापूर असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.

- Advertisement -

सात राज्यांमध्ये ८६८ जणांचा मृत्यू

या वर्षात झालेल्या पावसाने देशभरात झालेल्या हानीबद्दलचा एक अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्राने प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अतिवृष्टी, महापूर आणि भूस्खलन या आपत्तीमुळे देशभरातील सात राज्यांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात तब्बल ८६८ जणांचा जीव गेल्याचे समोर आले आहे. तर याचा सर्वात जास्त फटका केरळला बसला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -