घरदेश-विदेशRahul Gandhi : इंडिया आघाडीचे सरकार आल्यास तरुणांना काय फायदा? राहुल गांधी...

Rahul Gandhi : इंडिया आघाडीचे सरकार आल्यास तरुणांना काय फायदा? राहुल गांधी म्हणाले…

Subscribe

नवी दिल्ली : देशभरात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. याचबाबतचा आकडा आता राहुल गांधी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर, इंडिया आघाडीचे सरकार आल्यास युवकांसाठी नोकऱ्यांचे बंद दरवाजे उघडले जातील, असे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याकडून देण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. परंतु, ते नेहमीच सभांमधून याबद्दल बोलताना पाहायला मिळत असतात. (Rahul Gandhi’s assurance that the All India government will provide jobs to unemployed youth)

हेही वाचा… Jitendra Awhad : एसबीआयचा बँकींग परवाना आरबीआयने रद्द करायला हवा, असे आव्हाड का म्हणाले?

- Advertisement -

इंडिया आघाडीचे सरकार आल्यास देशातील बेरोजगार तरुणांना नोकरी देण्यात येईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी X या सोशल मीडिया साइटवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून दिले आहे. बेरोजगार तरुणाईसाठी बंद असलेले नोकरीचे दरवाजे खोलने, हा इंडिया आघाडीचा संकल्प आहे, असे आश्वासन राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा देखील साधला आहे. तर कोणत्या खात्यात किती रिक्त पदे आहेत, याबाबतची देखील माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी सत्तेत आल्यास देशातील 9 लाख 64 हजार रिक्त पदांची भरती करून तरुणांना रोजगार देऊ, अशी घोषणा करत राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “देशातील तरुणांनो, एक गोष्ट लक्षात घ्या! नरेंद्र मोदी यांचा रोजगार देण्याचा हेतू नाही. नवीन पदे निर्माण करणे तर दूरच, केंद्र सरकारच्या रिक्त पदांवरही ते बसले आहेत. केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीचा विचार केला, तर 78 विभागांमध्ये 9 लाख 64 हजार पदे रिक्त आहेत,” असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

महत्त्वाच्या खात्यांवर नजर टाकली, तर रेल्वेत 2.93 लाख, गृह मंत्रालयात 1.43 लाख आणि संरक्षण मंत्रालयात 2.64 लाख पदे रिक्त आहेत. 15 प्रमुख विभागांमध्ये 30 टक्यांपेक्षा जास्त पदे का रिक्त आहेत याचे उत्तर केंद्र सरकारकडे आहे का? असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी पोस्टच्या माध्यमातून रिक्त पदांची आकडेवारी समोर आणली आहे.

खोट्या आश्वासनांची झोळी घेऊन फिरणाऱ्या पंतप्रधानांच्याच कार्यालयात अत्यंत महत्त्वाची पदे मोठ्या संख्येने का रिक्त आहेत? कायमस्वरूपी नोकऱ्या देणे हे ओझे आहे, असे समजणारे भाजपा सरकार सातत्याने कंत्राटी पद्धतीला प्रोत्साहन देत आहे, जिथे ना सुरक्षा, ना सन्मान. त्यामुळे रिक्त पदांवर भरती करून त्यांना नोकरी देणे, हा त्यांचा हक्क असून ती रिक्त पदे भरण्यासाठी आम्ही ठोस योजना तयार केली आहे. बेरोजगार तरुणांसाठी नोकऱ्यांचे बंद दरवाजे उघडणे, हा इंडिया आघाडीचा संकल्प आहे. बेरोजगारीचा काळोख दूर करून तरुणांच्या आयुष्यात नवा सुर्योदय होणार असल्याचे राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून आश्वासन दिले आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा या कधीही जाहीर होऊ शकतात. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार करण्यात येत आहे. भाजपाने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केली आहे. परंतु, इंडिया आघाडीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील झालेली नाही. परंतु, उमेदवार घोषित करण्याआधीच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी लोकांना आश्वासने देण्यास सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने आणि विशेषतः राहुल गांधी यांनी तरुण वर्गाला आकर्षित करण्याची रणनिती आखल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -