घरदेश-विदेशदेशाचा पाया असलेली विचारधाराच माझे घर - राहुल गांधी

देशाचा पाया असलेली विचारधाराच माझे घर – राहुल गांधी

Subscribe

काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मागील १४५ दिवसांपासून सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचा सोमवारी समारोप झाला. श्रीनगरमध्ये काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकावून राहुल गांधी यांनी भारत जोडोची सांगता केली. या कार्यक्रमावेळी केलेल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले की, देशाचा पाया असलेली विचारधारा मजबूत करण्यासाठी आम्ही ही यात्रा काढली. माझ्याकडे स्वतःचे घर नाही. मी लहानपणापासून सरकारी घरांमध्ये राहिलो आणि वाढलो. माझ्यासाठी घर म्हणजे एक विचार आहे, जगण्याची आणि विचार करण्याची एक पद्धत आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, आपण प्रेमाने उभे राहून सर्वांशी प्रेमाने बोललो तर आपण यशस्वी होऊ याची आम्हाला खात्री होती. याच माध्यमातून आम्ही त्यांच्या विचारसरणीचा पराभव तर करूच, पण ती विचासरणी त्यांच्या मनातून काढून टाकू. लोक ज्याला काश्मिरियत म्हणतात, त्याला मी माझे घर मानतो. माझे पूर्वज काश्मीरहून अलाहाबादला गंगा किनारी जाऊन वसले. जाताना त्यांनी ‘कश्मिरियत’ सोबत नेली. म्हणजेच हा विचार सोबत नेला. कश्मिरियतचा विचार त्यांनी गंगेत अर्पण केला. हा विचार उत्तर प्रदेशात पसरला. त्यालाच लोक ‘गंगा जमुना तहजीब’ म्हणू लागले.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी आपले वडील दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मृत्यूबद्दलच्या आठवणीदेखील आपल्या भाषणात सांगितल्या. ज्याने हिंसा पाहिली आहे, अनुभवली आहे त्यालाच हिंसा कळते, असेही ते म्हणाले. जो हिंसाचार घडवतो जसे मोदी आहेत, अमित शहा आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे किंवा अजित डोवल असतील त्यांना या वेदना समजू शकणार नाहीत. पुलवामाच्या शहीद सैनिकांच्या मुलांच्या मनात काय वेदना झाल्या असतील, तेव्हा काय वाटले असेल ते मी समजू शकतो, माझी बहीण समजू शकते, असेही राहुल गांधी म्हणाले.

३५०० किमीचा प्रवास
७ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर असा ३५०० किमीचा प्रवास केला. यामध्ये १४ राज्ये आणि ७५ जिल्ह्यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -