घरताज्या घडामोडीधीरेंद्र महाराजचे संत तुकारामांविषयी वादग्रस्त वक्तव्य

धीरेंद्र महाराजचे संत तुकारामांविषयी वादग्रस्त वक्तव्य

Subscribe

राज्यभरातून संतापाची लाट, महाराष्ट्राची माफी मागण्याची राष्ट्रवादीची मागणी

दिव्य दरबारात चमत्कारांचे दावे करणार्‍या आणि अंनिसने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर महाराष्ट्रातून पळ काढणार्‍या धीरेंद्र उर्फ बागेश्वर महाराजने संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. संत तुकाराम महाराजांना त्यांची बायको मारायची म्हणून त्यांनी आयुष्यभर देवाचा धावा केला, त्याचमुळे ते विठ्ठलाच्या भक्तीत दंग झाले, असे वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र महाराजने केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून टीका होत आहे. धीरेंद्र महाराजने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडी आणि राष्ट्रवादीने केली आहे, तर वारकरी सांप्रदाय हा सहिष्णू आहे. आम्ही त्यांना माफ करतो, परंतु धीरेंद्र महाराजने अशी चुकीची वक्तव्ये करू नयेत, असे म्हणत देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी त्यांना माफी दिली आहे.

संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज काठीने मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा केला. त्यांना विचारण्यात आले बायकोकडून मार खाता, तुम्हाला लाज वाटत नाही का? त्यावेळी महाराज म्हणाले. ही तर देवाची कृपा आहे. ती मला रोज मारते. जर मला प्रेम करणारी बायको मिळाली असती तर मी देवाचा धावाच केला नसता, अशी मुक्ताफळे धीरेंद्र महाराज याने उधळली आहेत. धीरेंद्र महाराज याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सगळीकडून त्याच्यावर टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी मात्र बागेश्वर बाबांना माफी दिली आहे. ते म्हणाले की, तुकाराम महाराजांच्या पत्नी आमच्या मातोश्री आहेत. ज्यांनी तुकोबारायांना घास घातल्याशिवाय अन्नाचा कण घेतला नाही. तुकाराम महाराजांसाठी ज्यांनी आयुष्यभर त्यागाची भूमिका घेतली, त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांच्याबाबतीत ऐकीव माहितीद्वारे चुकीचे वक्तव्य करू नये. वारकरी सांप्रदाय हा सहिष्णू आहे. आम्हीही त्यांना माफ करतो, असे मोरे महाराज म्हणाले.

- Advertisement -

तर, धीरेंद्र बाबाच्या वक्तव्याने केवळ वारकरी संप्रदायाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. त्यामुळे बागेश्वर धामच्या धीरेंद्र बाबाने माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी केली आहे.

धीरेंद्र कृष्ण महाराजाच्या विधानाचा जाहीर निषेधच झाला पाहिजे. जे लोक असे बोलतात ते अर्थातच चुकीचे आहे. मी आध्यात्माकडे वळलेले आहे. मी अध्यात्म करते म्हणजे माझ्या घरात वाईट आहे असे नाही. हे भारतीय संस्कार आहेत. हे संस्कार आपल्या मुलांवर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तुकाराम महाराजांचा अंधश्रद्धापमान केला जात असेल तर एक समाज म्हणून आपण त्याचा निषेध केला पाहिजे.
सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -