घरताज्या घडामोडीयुक्रेनमधील बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

युक्रेनमधील बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Subscribe

रशिया-युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस चिघळत चालले असून सलग सहाव्या दिवशी रशियाकडून युक्रेनवर हवाई हल्ले सुरूच होते. युक्रेनची राजधानी किव्ह आणि खारकीव्हवर रशियन लष्कराकडून हल्ले सुरू असताना खारकीव्हमध्ये केलेल्या बॉम्ब हल्ल्यात मंगळवारी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. नवीन शेखरप्पा गायनागोदर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शेखरप्पाच्या घरी फोन करत त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंधम बागची यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली. अत्यंत दु:खाने आम्ही या वृत्ताला दुजोरा देत आहोत की एका भारतीय विद्यार्थ्याचा खारकीव्ह येथे मंगळवारी सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे, असे बागची यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाच्या परदेश सचिवांनी रशिया आणि युक्रेनमधील राजदूतांशी फोनवरून संपर्क साधला. भारतीयांना या युद्धग्रस्त शहरांमधून बाहेर काढण्यासाठी तातडीने सेफ पॅसेज उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भारताकडून करण्यात आली, असेही बागची म्हणाले.

- Advertisement -

पंतप्रधानांनी केले मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन
युक्रेनमध्ये वेगवेगळ्या शहरांत अडकलेले भारतीय आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्राचे शर्थीचे प्रयत्न सुरूच आहेत. युक्रेनमधून आतापर्यंत ९००० भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. परंतु खारकीव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यनंतर भारताची चिंता वाढली आहे. कारण अजूनही ३ हजार भारतीय विद्यार्थी खारकीव्हमध्ये अडकले आहेत.

खारकीव्ह हे युक्रेनच्या पश्चिम सीमेपासून दूर आहे. त्यामुळे येथून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान आहे. हवाई हल्ल्यादरम्यान १५०० किमी दूर असलेल्या रोमानियाचा सीमेपर्यंत पोहोचणे देखील शक्य नाही. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रशिया आणि युक्रेनकडून सकारात्मक आणि तातडीने प्रतिसाद मिळणे आवश्यक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे. खारकीव्हवर रशिया क्लस्टर बॉम्बचे हल्ले करत आहे, जे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. एवढेच नाही तर रशियाचे सैन्य खारकीव्हवर व्हॅक्यूम बॉम्बने हल्ला करत असल्याचा दावा अमेरिकेतील युक्रेनच्या राजदूताने केला आहे. जे जिनिव्हा करारानुसार प्रतिबंधित आहे.

- Advertisement -

आमचा लढा आमच्या स्वातंत्र्यासाठी
युक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी मंगळवारी युरोपीयन युनियनला संबोधित केले. आमचा निर्धार पक्का आहे. आमचे मनोधैर्य प्रचंड उंचावलेले आहे. आम्ही लढत आहोत. आमच्या स्वातंत्र्यासाठी, आमच्या मायभूमीसाठी आणि जिवंत राहण्यासाठी. तीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. यासोबत आम्ही लढा देत आहोत युरोपचे बरोबरीचे सदस्य होण्यासाठी. आज आम्ही लोकांना दाखवून देत आहोत की आम्ही नेमके कोण आहोत, असे म्हणत जेलेन्स्की भावूक झाले.

युरोपीयन युनियनचा सदस्य होणार
युक्रेनला सदस्य बनण्याची प्रक्रिया सुरू झाली असून युरोपीयन युनियनमध्ये सहभागी होण्यासाठी युक्रेनने केलेला अर्ज युरोपीयन संसदेने स्वीकारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -