घरदेश-विदेश...ते अमित शाह वेगळे; गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुस्लीम नेत्यांकडून कौतुक

…ते अमित शाह वेगळे; गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुस्लीम नेत्यांकडून कौतुक

Subscribe

नवी दिल्ली : रामनवमी दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांप्रकरणी मुस्लिम धर्मगुरूंच्या शिष्टमंडळाने बुधवारी (5 एप्रिल) रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने अनेक मुद्दे अमित शाहांसमोर मांडले. शाह यांनी रामनवमीनंतर झालेल्या जातीय हिंसाचाराच्या घटना आणि द्वेष पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वास दिले आहे. या भेटीवेळी शिष्टमंडळाचे नेतृत्व जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी, सचिव नियाज फारुकी आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य कमाल फारुकी आणि प्राध्यापक अख्तरुल वासे यांनी केले.

देशात रामनवमीच्या मिरवणुकांमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. यापैकी काही घटना भाजपचे शासन नसलेल्या राज्यांमध्ये घडल्या. भाजपने फक्त राजकीय फायद्यासाठी हा हिंसाचार घडवून आणल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे भाजपने आरोप केला आहे की, त्यांच्या रॅलींवर हल्ला केला गेला. या सर्व पार्श्वभूमीवर मुस्लिम धर्मगुरूंच्या शिष्टमंडळाने अमित शाहांची भेट घेतली.

- Advertisement -

सचिव नियाज फारुकी यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, शिष्टमंडळाने देशासमोरील 14 आव्हानं अमित शाहांसमोर मांडली आहेत. यात बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या जातीय हिंसाचाराच्या घटना या बैठकीतील महत्त्वाचा विषय होता. यावेळी नियाज फारुकी यांनी अमित शाहांचे कौतुक केले आहे. आपण ज्यांना राजकीय भाषण करताना पाहतो ते अमित शाह वेगळे होते. शाह यांनी आमच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी आमचे तपशीलवार ऐकले, ते नकार देण्याच्या मनस्थितीत नव्हते, असेही फारुकी यांनी सांगितले.

बिहारमधील नालंदा येथील मदरशाला आग लावण्याच्या घटनेचा मुद्दाही मुस्लिम नेत्यांनी या बैठकीत उपस्थित केला. याशिवाय राजस्थानमधील भरतपूर येथील रहिवासी जुनैद आणि नसीर यांच्या हत्येबाबतही बैठकीत चर्चा झाली. नासीर (२५) आणि जुनैद (३५) यांचे १५ फेब्रुवारी रोजी गोरक्षकांनी अपहरण केले होते. या दोघांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी हरियाणातील भिवानी येथे एका जळालेल्या गाडीत आढळून आले होते.

- Advertisement -

शिष्टमंडळाने अमित शाहांना तुमच्या मौनामुळे मुस्लिमांमध्ये निराशा असल्याचे म्हटल्यानंतर शहा म्हणाले की, आम्ही कोणत्याही नेत्याला लक्ष्य केले नाही, कारण ते आमचे काम नाही. देशात सहकार्य निर्माण करणे आणि वातावरण बदलणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.

फारुकी यांनी बैठकीत समलिंगी विवाह आणि समान नागरी संहिता या विषयांवरही त्यांची बाजू मांडली, मात्र त्यावर अमित शाहांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर मुस्लिम शिष्टमंडळ कितपत समाधानी आहे, असे विचारले असता? फारुकी म्हणाले की, ही कोंडी फोडण्यासाठी बैठक होती. आम्ही पुढाकार घेऊन बैठकीत आमचे मुद्दे मांडले आहेत. आम्ही सरकारच्या वतीने काहीही बोलणार नाही, पण अमित शाह यांनी मी जे बोलतो ते आचरणातही आणतो, असे सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -