घरदेश-विदेशलग्नाच्या दुसऱ्या दिवशी तरुणाची निर्घृण हत्या, मुलाच्या कुटुंबियांनी स्विकार केले सुनेला

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तरुणाची निर्घृण हत्या, मुलाच्या कुटुंबियांनी स्विकार केले सुनेला

Subscribe

केरळमध्ये एका तरुणाची लग्नाच्या दुसऱ्या दिवशी निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. बहिणीने दलित तरुणाशी लग्न केल्याने तरुणीच्या भावाने मित्रांच्या साह्याने तरुणाचे अपहरण करुन त्याची हत्या केली. हत्येनंतर तरुणाचा मृतदेह कालव्यामध्ये फेकून देण्यात आला. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

कुटुंबियांच्या विरोधात जाऊन केलं लग्न
केरळमधील कोट्टायम येथे राहणाऱ्या २३ वर्षांच्या केविनने २१ वर्षांची निनूशी शुक्रवारी कोर्टामध्ये लग्न केले. या दोघांनीही अलागिरी येथील बी के कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेतले होते. केविन आणि निनू गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. केविन आणि निनू यांच्या लग्नावर निनूचे कुटुंबिय खूश नव्हते. निनूने घरच्यांच्या विरोधात जाऊन केविनशी लग्न केले होते. निनूच्या भावाने त्याच्या मित्रांच्या साह्याने केविनच्या घरी येऊन हल्ला केला. त्यानंतर या हल्लेखोरांनी केविनच्या घराची तोडफोड करत केविनला आणि त्याच्या चुलत भावाला मारहाण केली. त्यांनी केविनला गाडीमधून घेऊन गेले.

- Advertisement -

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे केविनची हत्या
याप्रकरणी केविनच्या वडील गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. यावेळी पोलिसांनी केविनच्या वडिलांना सांगितले की, मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांचा दौरा असून आम्ही या दौऱ्याच्या बंदोबस्तात व्यग्र आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी केविन याची हत्या झाल्याची माहिती कुटुंबियांना कळाली. हत्येची माहिती कळताच केविनच्या कुटुंबियांना धक्का बसला, केविनच्या अपहरणासंदर्भात केविनचे वडील पोलिसांना जिवाचा आकांत करत सांगत होते. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार लिहून घेतली नाही. पोलीस तपासानंतर असं उघड झालं की निनूच्या भावांनीच केविनची हत्या केली. जर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असती तर केविनचा जिव वाचला असता असा आरोप केविनच्या वडिलांनी केलाय. याप्रकरणी हलगर्जीपणा केल्यामुळे पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं.

तिच्या लग्नाची माहिती मिळताच तो दुबईवरुन आला परत
केविन हा एकुलता एक मुलगा होता. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला दुबईमध्ये नोकरी मिळाली. आम्हाला केविन आणि निनू यांच्या नात्यासंदर्भात काहीच माहिती नव्हती. काही महिन्यांपूर्वी केविन घरी परत आला होता. निनूचे कुटुंबिय तिचे दुसऱ्या मुलाशी जबरदस्ती लग्न लावून देत आहेत. त्यामुळे केविन केरळला परत आला असल्याची माहिती त्याने दिली असल्याचे केविनच्या वडिलांनी सांगितले.

- Advertisement -

मुलाच्या हत्येनंतरही सुनेचा केला स्विकार
निनू ही श्रीमंत कुटुंबातील मुलगी आहे. तर केविन हा दलित ख्रिश्चन आणि गरीब कुटुंबातील मुलगा असल्याने निनूच्या कुटुंबियांना निनूचे केविनशी लग्न करणे मान्य नव्हते. त्यामुळे तिच्या भावाने केविनची हत्या केली, अशी माहिती केविनच्या वडिलांनी दिली. केविनच्या हत्येची माहिती कळताच निनू चक्कर येऊन पडली. त्यानंतर तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. शुध्दीवर आल्यानंतर निनूने माझ्या केविनला परत आणा अशी मागणी केली. निनूने तिच्या आई-वडीलांच्या घरी जाण्यास नकार दिला. तिचे या जगात कोणी नसल्याचे तिने सांगितले. निनूने तिला केविनच्या घरीच राहायचे असल्याचे सासऱ्यांना सांगितले. त्यानंतर मी तिला माझ्या घरी आणले असून ती आमच्यासोबत राहत असल्याचे केविनच्या वडिलांनी सांगितले.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -