घरसंपादकीयअग्रलेखपाहुणे तुपाशी, घरचे उपाशी!

पाहुणे तुपाशी, घरचे उपाशी!

Subscribe

महाविकास आघाडीची सत्ता उलथवून शिंदे गटाने महाराष्ट्रात भाजपला पुन्हा सत्तेची दारे उघडून दिली. शिवसेनेतील बहुतांश खासदार, आमदार ठाकरेंची साथ सोडून महायुतीत सामील झाले. अद्यापही काही खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटाशी संधान बांधून असल्याची चर्चा आहे.

नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी शिंदे गट जीवापाड प्रयत्न करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर भाजपकडून दुय्यम स्थान दिले जात असल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे. अजित पवार गटातील नेत्यांना बलाढ्य खाती दिली गेली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असलेले अजित पवार निधी देत नसल्याची नाराजी शिंदे गटातील आमदारांनी फूट पडल्यानंतर बोलून दाखवली होती. तेच अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर भाजपने त्यांनाच अर्थमंत्रीपद दिल्याने शिंदे गट नाराज आहे.

- Advertisement -

पवार यांना अर्थमंत्रीपद देऊ नये यासाठी शिंदे गटाकडून दबावही टाकण्याचे प्रयत्न केले गेले, पण भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामागे काय गणित आहे हेही एक गूढ आहे. एकतर कबूल केल्यानंतरही काहींना मंत्रीपदे तर काहींना महामंडळे दिली गेली नाहीत. उलट ज्या अजित पवारांवर आक्षेप घेऊन ठाकरेंची साथ सोडून भाजपशी संगत केली त्याच भाजपने दगा दिल्याची भावना शिंदे गटात आहे, पण केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीपोटी सहन होईना आणि सांगताही येईना, अशी अवस्था शिंदे गटाची झाली आहे.

लोकसभेत चारशेहून अधिक जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने भाजपकडून जय्यत तयारी सुरू आहे. यात कुठलाही धोका पत्करायची भाजप नेतृत्वाची तयारी नाही. म्हणूनच राज्यातील लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी करत जितक्या जागा स्वत: लढवता येतील तितक्या लढवण्याचा भाजपचा मनसुबा आहे. शिंदे गटाकडे शिवसेना आणि चिन्ह असले, बहुतांश खासदार, आमदार असले तरी सामान्य शिवसैनिक ठाकरेंसोबत जाण्याची भीती भाजपला वाटत आहे. शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपकडून शिंदे गटातील लोकसभा मतदारसंघातील काही मतदारसंघ स्वत:कडे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

- Advertisement -

कल्याण आणि पालघर लोकसभा मतदारसंघ ही त्यातील ठळक उदाहरणे आहेत. या दोन्ही मतदारसंघांवर भाजपचा दावा आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ मुलाला मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न असून त्यासाठी पालघर लोकसभा मतदारसंघावर पाणी सोडण्याचीही तयारी शिंदेंकडून असणार आहे. म्हणूनच मुख्यमंत्री शिंदे पालघर लोकसभा मतदारसंघासाठी फारसे आग्रही नसल्याचे दिसून येते. सोबत आलेल्या खासदारांना पुन्हा तोच मतदारसंघ मिळवून देण्यात मुख्यमंत्री शिंदे अपयशी ठरले तर त्यांचे नेतृत्व धोक्यात येण्याची भीती असल्याने भाजपचा डोळा असलेल्या इतर मतदारसंघावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता भाजप विरोधी पक्षातील ताकदवान नेत्यांना आपल्या कळपात सामील करून घेण्यासाठी आटापिटा करत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काही महिन्यातच येऊ घाललेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षातील आमदार भाजपच्या गळाला लागणार आहेत. त्यावेळी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटासह राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच अपक्षांचा विचार करावा लागणार आहे. त्यावेळी शिंदे गट किती मजबूत अवस्थेत असेल त्यावरून त्यांच्या पदरात विधानसभेच्या जागा पडणार आहेत. हाच शिंदे यांच्या कसोटीचा काळ असणार आहे.

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर आता काँग्रेसचेही नेते भाजपच्या गळाला लागण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत. तरीही या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद नाही. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले आहे. त्याविषयीची खंत भाजपच्या नेत्यांनी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. आता तीन मुख्य पक्षांचे नेते एकतर भाजपमध्ये आले आहेत किंवा भाजपच्या

मित्रपक्षांमध्ये सामील झाले आहेत. एवढ्या गर्दीत जेव्हा तिकीटवाटप होईल तेव्हा एकाच जागेसाठी अनेक दावेदार असण्याची परिस्थिती उद्भवू शकते. अशावेळी एकाला आपल्या मतदारसंघावर पाणी सोडावे लागेल. त्यातून नाराजी निर्माण होऊ शकते. बाहेरून आलेल्यांसाठी भाजपच्या निष्ठावानांना त्याचबरोबर बाहेरून आलेल्यांनाही आपल्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवाव्या लागू शकतात. दुय्यम पद स्वीकारावे लागू शकते. मूळ पक्षात असताना मिळत होत्या त्या संधी त्यांना आता मिळतील का? त्यातूनच अन्य पक्षांप्रमाणेच भाजपमध्येही असंतोष वाढू शकतो.

राज्यसभेच्या उमेदवारीवरून भाजपमधील खदखद भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे चिरंजीव चिन्मय भांडारी यांच्या एका पोस्टने दिसून आली आहे. पंकजा मुंडे यांचीही अस्वस्थता अधूनमधून बाहेर येत असते. राज्यसभेच्या उमेदवारी यादीत पंकजा मुंडे यांचे नाव होते, मात्र पुन्हा एकदा त्यांना डावलले गेले आहे. दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरायच्या एक दिवस आधी भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभा बहाल करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक साधायची आहे. त्यासाठी भाजपने तत्त्वांना तिलांजली दिली आहे. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, भावना गवळी, सुनील तटकरे अशा भाजपमध्ये बाहेरून आलेल्या पाहुण्यांना मानाचे पान मिळाले आहे. त्यामुळे पाहुणे तुपाशी आणि घरचे उपाशी अशी स्थिती भाजपमध्ये झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -