घरसंपादकीयअग्रलेखजागावाटपात ठाकरे भारी!

जागावाटपात ठाकरे भारी!

Subscribe

अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा चांगल्यापैकी उडू लागला असताना महाराष्ट्रात एकमेकांविरोधात उभी ठाकलेली महायुती आणि महाविकास आघाडी यांचे अंतिम उमेदवार कोण, याकडे तमाम जनतेचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीने यात बाजी मारली आहे. मंगळवारी आघाडीने आपल्या ४८ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला २१, काँग्रेसला १७, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला १० जागा मिळाल्या आहेत.

या तीन पक्षांचे यापूर्वी कधी पटत नसे, परंतु दिल्लीतून भाजपची सत्ता उखडून टाकायची या एकाच विचाराने देशातील २७ हून अधिक पक्ष एकत्र आले, त्यात हे तीन प्रमुख पक्ष महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न चालू आहेत.

- Advertisement -

या आघाडीला महाराष्ट्रात दोन ते तीन जागा देण्यास आघाडी तयार होती, परंतु आंबेडकर यांच्या धरसोड वृत्तीमुळे त्यांचे आघाडीशी अद्याप सूत जमताना दिसत नाही. त्यामुळे वंचित आघाडीशिवाय महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसने घेतल्याने शिवसेना ठाकरे गटाने शेजारच्या सांगलीवर दावा ठोकला. इतकेच नाही तर परस्पर चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली आणि प्रचारही सुरू केला.

याला स्थानिक काँग्रेसजनांकडून विरोध झाला असला तरी सगळं काही ठीक होईल, असा दावा काँग्रेसचे नेते करीत आहेत. काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आणि उमेदवारीसाठी शड्डू ठोकलेले विशाल पाटील यांनी ‘ऑल इज नॉट वेल’ असेच जणू संकेत दिले आहेत. त्यामुळे सांगलीची लढत महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार का, हा कळीचा मुद्दा आहे. विश्वजीत कदम आता कोणता पवित्रा घेतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांत वेळीच पॅचअप झाले नाही तर आघाडीत काहीसे संशयाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी आपला हट्ट ताणून धरलाच तर आघाडीचा धर्म पाळण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. अर्थात कारवाईचा विचार करावा लागेल, असा त्याचा सरळ अर्थ आहे. सांगलीभोवती सुरू झालेले नाट्य कोणत्या वळणावर जाऊन ठेपणार हा उत्सुकता ताणणारा भाग आहे. आघाडीत भिवंडीच्या जागेवरूनही तणातणी झाली.

येथे आठ वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, तसेच गेल्या निवडणुकीत भाजपच्या कपिल पाटील यांच्याविरोधात काँग्रेसचाच उमेदवार होता, असा युक्तिवाद करत काँग्रेसने भिवंडीची जागा आपलीच असल्याचा दावा सुरुवातीपासून सांगितला होता, मात्र महाविकास आघाडीचे नेते आणि शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी परस्पर तेथे आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर करून काँग्रेसला धक्का दिला. यावरून तेथील काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

त्यामुळे सांगलीप्रमाणे भिवंडीतील नाराज नेते, कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे आव्हान काँग्रेसच्या नेत्यांपुढे आहे. जागांचे वाटप निश्चित झाल्याने कार्यकर्त्यांनी सबुरीने घ्यावे, असा महाविकास आघाडीतील नेत्यांचा नाराजांना सांगावा असला तरी नाराज खरोखरंच सबुरीने घेऊन अधिकृत उमेदवाराचा एकदिलाने प्रचार करणार का, हा खरा मुद्दा आहे. दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आलेले महायुतीमधील भाजप आणि शिंदे गट यांच्या अद्याप काही जागांवर एकमत होण्याचे चिन्ह दिसत नाही. या दोघांच्या रस्सीखेचीत महायुतीमधील अजित पवार गटाने जवळपास सहा जागा (नाशिकची जागा मिळाली तर) पदरात पाडून घेत काहीशी बाजी मारल्याचे चित्र आहे.

ठाणे आणि कल्याणच्या जागेवरून भाजप, शिंदे गटात तू तू मैं मैं चालू असताना दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे हेच पुन्हा उमेदवार असतील, असे जाहीर करून टाकले. फडणवीस यांनी या जागेची घोषणा करण्यामागे मेख दडली आहे. कारण भाजपला २८ वर्षांनंतर ठाण्याची जागा पदरात पाडून घ्यायची आहे. या जागेसाठी भाजपचे डॉ. संजीव गणेश नाईक यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे महायुतीत ‘ऑल इज वेल’ असे काही चित्र दिसत नाही. नाशिकच्या जागेवरून जोरदार धूसफूस सुरू आहे.

सातार्‍याच्या नावाचीही अद्याप घोषणा नाही. त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यात भिन्न विचारसरणी असलेल्या नेत्यांच्या महाविकास आघाडीने महायुतीवर आघाडी घेतल्याचे दिसत आहे. युतीचे अंतिम उमेदवार कोण, याकडे आता सार्‍या महाराष्ट्राचे लक्ष आहे. उमेदवारीचे चित्र स्पष्ट होत नसतानाच काही पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. वायव्य मुंबईतील ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांना विरोध करणारे मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांना काँग्रेसमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

माईक हाती आल्यानंतर विरोधी पक्षांवर यथेच्छ तोंडसुख घेणारे काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी एकनाथ शिंदे यांचा हात पकडला आहे. अन्य पक्षांतही थोडीफार अशीच परिस्थिती आहे. अर्थात निवडणुका आल्या की नेत्यांचा ‘स्वाभिमान’ उफाळून येणे ही काही नवी बाब नाही. खरंतर बंडखोरीच्या निमित्ताने या बंडखोरांच्या खर्‍या निष्ठा कोणाकडे आहेत हे स्पष्ट होत असते. निवडणुकीचे अर्ज भरेपर्यंत अशा गमती-जमती पाहायला न मिळाल्या तरच नवल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -