घरसंपादकीयदिन विशेषनामवंत अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ

नामवंत अर्थतज्ज्ञ धनंजय गाडगीळ

Subscribe

भारताचे नामवंत अर्थतज्ज्ञ व थोर विचारवंत धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचा जन्म १० एप्रिल १९०१ मध्ये नागपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण नागपूर येथील पटवर्धन विद्यालयात व केंब्रिजच्या क्वीन्स कॉलेजमध्ये झाले. मुंबई सरकारच्या अर्थखात्यात त्यांनी १९२४-२५ मध्ये एक वर्ष नोकरी केली. सुरत येथील एम. टी. बी. महाविद्यालयाचे प्राचार्यपद पाच वर्षे सांभाळल्यानंतर १९३० पासून ते पुण्याच्या ‘गोखले अर्थशास्त्र संस्थे’च्या संचालकपदी रुजू झाले.

वयाच्या ६५व्या वर्षापर्यंत तेथे निष्ठापूर्वक काम करून त्यांनी ती संस्था नावारूपाला आणली. १९६६-६७ मध्ये ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. काही वर्षे ते राज्यसभेचे सभासद होते. सप्टेंबर १९६७ मध्ये त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद स्वीकारले. डॉ. गाडगीळ भारतातील सहकार चळवळीचे आद्य प्रणेते मानले जातात. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने व सहकारी बँका वाढीस लावण्याचे श्रेय त्यांना जाते.

- Advertisement -

भारताच्या अर्थकारणाचा विशेषतः कृषीविषयक जटिल समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी आपले मूलग्राही विचार अनेक ग्रंथांतून व लेखांतून मांडले. सरकारने नेमलेल्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले. अनेक आर्थिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता.

त्यांनी लिहिलेली २५हून अधिक पुस्तके प्रसिद्ध असून ‘द इंडस्ट्रियल ईव्हलूशन इन इंडिया’ (१९२८), ‘द फेडरल प्रॉब्लम इन इंडिया’ (१९४४), ‘रेग्युलेशन ऑफ वेजिस’ (१९५४), ‘प्लॅनिंग इन इंडिया अँड इकॉनॉमिक पॉलिसी’ (१९६१) यांसारख्या ग्रंथांतून त्यांच्या तर्कशुद्ध व साक्षेपी दृष्टिकोनाचा प्रत्यय येतो. आर्थिक विकास लोकाभिमुख असावा, असे मत ते आग्रहाने मांडत. नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर पुण्याकडे परतताना हृदयविकाराचा झटका येऊन ३ मे १९७१ रोजी त्यांचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -