घरसंपादकीयदिन विशेषपहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद

पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद

Subscribe

मौलाना अबुल कलाम आझाद यांचा आज स्मृतिदिन. मौलाना आझाद हे भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी सौदी अरेबियातील मक्का येथे झाला. त्यांचे वडील मौलाना खैरुद्दीन हे धर्मगुरू होते. ही भूमी मौलाना खैरुद्दीन यांना न मानवल्याने ते आपल्या कुटुंबासह भारतात आले आणि त्यांनी कोलकाता शहरात वास्तव्य केले. मौलाना आझाद लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. मौलाना आझाद यांना अरबी, फारशी, इंग्रजी व उर्दू या भाषा चांगल्या अवगत होत्या व ते चारही भाषांतून लिखाण करीत असत. ते एक उत्कृष्ट वक्तेदेखील होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहत असत. ते हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक होते. ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक निष्ठावान शिपाई होते.

फारसा गाजावाजा न करता कार्य करीत राहणे हे त्यांचे वैशिष्ठ्य होते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद, अ‍ॅनी बेझंट, लाल बहादूर शास्त्री, विठ्ठलभाई पटेल यांच्यासमवेत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी उडी घेतली. भारत हा आपला देश आहे, त्यावर परकियांचा ताबा ही दडपशाही आहे, अशी त्यांची भूमिका होती. भारतावर स्वकियांचीच सत्ता हवी असे त्यांचे मत होते. कष्ट आणि निष्ठा यावर मौलानांची नितांत श्रद्धा होती व शेवटपर्यंत त्यांनी या विचारांवरच वाटचाल केली.

- Advertisement -

१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं. जवाहरलाल नेहरूंनी मौलानांकडे शिक्षण मंत्रालयाचे काम सोपवले व ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री झाले. त्यांनी त्या काळी अत्यंत बिकट परिस्थितीतही भारतात शिक्षणाचा प्रसार व प्रचार उत्तम प्रकारे केेला. त्यांना युरोपच्या तत्कालीन समस्यांचे चांगले ज्ञान होते. तसेच त्यांना युरोपियन साहित्याचेही चांगले ज्ञान होते. महाकवी बायरन आणि फ्रान्सच्या कादंबरीकारांची त्यांना चांगली माहिती होती. अशा या व्यासंगी शिक्षणमंत्र्यांचे २२ फेब्रुवारी १९५७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -