घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

हा दंशु जंव नये हातां । तंव माझें साचोकारपण पार्था । न संपडे गा सर्वथा । जेविं तुषीं कणु ॥
पार्था, हे वेदान्तसिद्धान्ताचे वर्म जोपर्यंत हाती लागत नाही, तोपर्यंत माझे खरे स्वरूप कधीही कळणार नाही. ज्याप्रमाणे, कोंड्यात शोधू लागले असता दाण्याचा एक कणसुद्धा सापडत नाही.
एर्‍हवीं अनुमानाचेनि पैसें । आवडे कीर कळलें ऐसें । परि मृगजळाचेनि वोलांशे । काय भूमि तिमे? ॥
एर्‍हवी अनुमानाच्या जोरावर जीवांना परमात्मज्ञान झाले आहे, असे वाटते खरे, परंतु तें व्यर्थ? कारण, मृगजळाच्या ओलाव्याने जमीन कधी भिजली आहे का? नाही.
जे जाळ जळीं पांगिलें । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें । परि थडिये काढूनि झाडिलें । तेव्हां बिंब कें सांगै? ॥
माशाला धरण्याकरिता जे जाळे पाण्यात पसरतात, त्यात चंद्राचे बिंब सापडल्यासारखे दिसते, परंतु ते जाळे नदीच्या काठावर काढून झाडल्यावर चंद्रबिंब कोठे असते, सांग बरे!
तैसें बोलवरि वाचाबळें । वायांचि झकविजती प्रतीतीचे डोळे । मग साचोकारें बोधावेळे । आथि ना होइजे ॥
त्याचप्रमाणे, ‘आम्हाला अनुभव आला’ असे शब्दांच्या व वाणीच्या योगाने कितीएक लोक वरकरणी दाखवतात पण मग खर्‍या बोधाच्या परीक्षेची वेळ आली, म्हणजे त्या वेळेस खरोखर त्यांना असलेले वाचाळ ज्ञान निरुपयोगी होते.
किंबहुना भवा बिहाया । आणि साचें चाड आथि जरी मियां । तरी तूं गा उपपत्ती इया । जतन कीजे ॥
किंबहुना, या संसाराला भिऊन माझ्या प्राप्तीची जर खरी इच्छा असली तर तुला हे जे मी वर्म सांगितलें, ते आपल्या लक्षात पूर्ण वागव.
एर्‍हवीं दिठी वेधली कवळें । तैं चांदणियातें म्हणे पिंवळें । तेविं माझ्या स्वरूपीं निर्मळें । देखती दोष ॥
एर्‍हवी काविळीच्या योगाने दृष्टी दूषित झाल्यावर तो मनुष्य चांदण्याला पिवळे म्हणतो, त्याप्रमाणे निर्दोष असे जे माझे शुद्ध स्वरूप, त्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याला दोष दिसतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -