घरसंपादकीयदिन विशेषनिर्मोही लोकनेते शंकरराव चव्हाण

निर्मोही लोकनेते शंकरराव चव्हाण

Subscribe

शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म १४ जुलै १९२० रोजी पैठण येथे झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एलएलबी झाले. १९४५ मध्ये त्यांनी वकिलीची सनद मिळवली. १९४८-४९ मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. नांदेडचे नगराध्यक्ष (१९५६), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक इत्यादी विविध पदे त्यांनी भूषविली. पुढे १९६० मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर १९७२ पासून फेब्रुवारी १९७५ पर्यंत ते कृषीमंत्री होते. २१ फेब्रुवारी १९७५ रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंट्यात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांद्वारा त्यांनी मराठवाड्याचा विकास घडवून आणला. जायकवाडी प्रकल्प हा त्यांच्याच प्रयत्नाचे मोठे फळ आहे. भ्रष्टाचाराचे निर्मूलन, अधिक कार्यक्षम प्रशासन, १० लाख टनांहून अधिक धान्य उत्पादन वगैरे त्यांची धोरणे आहेत. कोणताही राजकीय प्रश्न ते समझोत्याने सोडवित असत. महाराष्ट्राच्या ‘सचिवालया’चे ‘मंत्रालय’ असे नामकरण शंकरराव यांनीच केले. शेतीला बारमाही पाणी की, आठमाही पाणी, या वादात गरीब शेतकर्‍यांच्या बाजूने शंकरराव उभे राहिले.

- Advertisement -

शेतकर्‍यांची सावकारांकडे गहाण पडलेली भांडी-कुंडी मुख्यमंत्री झाल्यावर ५० कोटी रुपये अदा करून त्यांनीच सोडवून दिली. मुंबईतील गिरण्यांच्या जमिनी मालकांच्या घशात घालायला शंकररावांचा विरोध होता. राजकारणातील सत्तेचा मोह आणि सत्तेपासून मिळणारे फायदे घेताना भलेभले लडबडून जातात. शंकररावांना सत्तेचा मोह झाला नाही आणि चुकीचे वागणे त्यांच्याकडून कधी झाले नाही. अशा या थोर लोकनेत्याचे २६ फेब्रुवारी २००४ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -