घरसंपादकीयदिन विशेषमराठी कोशकार, लेखक चिं. ग. कर्वे

मराठी कोशकार, लेखक चिं. ग. कर्वे

Subscribe

चिंतामणी गणेश कर्वे यांचा आज स्मृतिदिन. चिं. ग. कर्वे हे मराठी कोशकार व लेखक होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १८९४ रोजी वडोदरा याठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. १९१७ मध्ये ते गणित विषय घेऊन पदवीधर झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्ञानकोशकार केतकरांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. तसेच केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यात त्यांनी प्रचंड मदत केली.

१९२८ च्या सुमारास त्यांनी महाराष्ट्रीय कोश मंडळाची स्थापना केली. सुलभ विश्वकोशाच्या रचनेतही त्यांचा सहभाग होता. याशिवाय महाराष्ट्रीय शब्दकोश, महाराष्ट्र वाक्य संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश अशा अनेक कोशांच्या रचनेत त्यांनी कार्य केले. त्यांनी ‘मानवी संस्कृतीचा इतिहास’, ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’, ‘कोशकार केतकर’, ‘प्राच्य आणि पाश्चात्य नीतिध्येये’, ‘आनंदीबाई पेशवे आदी ग्रंथांसह विविध नियतकालिकांतून संस्कृती, इतिहास, साहित्य भाषा या विषयांवर ४०० हून अधिक लेख लिहिले आहेत.

- Advertisement -

याखेरीज ‘पेशवेकालीन स्त्रियांची लहान लहान चरित्रे,’ ‘पुण्यातील जुन्या अवशेषांवरची टिपणे,’ ‘छोट्या शोधनोंदी,’ ‘व्यक्ती नोंदी,’ ‘व्यक्तिपरिचय’ हे त्यांचे लेखनकार्य अतिशय मोलाचे आहे. महाराष्ट्रीय विद्वत्तेचा आदर्श म्हणून त्यांच्या शब्दकोशाकडे पहिले जाते. त्यांचे कोशरचनेचे कार्य पुढील कोशरचनाकर्त्यांना प्रेरणादायी ठरले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन उंचावणार्‍या अनेक कार्यांत कर्वे आपुलकीने लक्ष घालीत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची धुरा त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिटणीसपदावरही ते होते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे कर्वे हे १० वर्षे चिटणीस होते. अशा या थोर कोशकाराचे १६ डिसेंबर १९६० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -