घरसंपादकीयदिन विशेषभौतिकशास्त्रज्ञ जे. जे. थॉमसन

भौतिकशास्त्रज्ञ जे. जे. थॉमसन

Subscribe

सर जोझेफ जॉन थॉमसन उर्फ जे. जे. थॉमसन हे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ होते. थॉमसन यांचा जन्म 18 डिसेंबर 1856 रोजी इंग्लंडमध्ये मँचेस्टरमधील चीटम हील येथे झाला. थॉमसन यांचे शिक्षण मँचेस्टरमधील ओवेन्स कॉलेजमध्ये झाले. ते केंब्रिज कॉलेजमध्ये प्रायोगिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक (१८८४-१९१८) व ट्रिनिटी कॉलेजचे ‘मास्टर’ (१९१८-४०) होते. थॉमसन यांनी अत्यंत कमी दाबाला वायूंमधून होणार्‍या विद्युत धारेच्या संवहनाविषयी संशोधन केले. थॉमसन यांनी जॉन एस. टाऊनसेंड आणि हेरॉल्ड ए. विल्सन या आपल्या सहकारी संशोधकांच्या मदतीने प्रयोग केले. कॅथोडपासून निघणारे ऋण विद्युत प्रभारित कण हे पदार्थाच्या अणूंमधील मूलभूत कण असले पाहिजेत, असा निष्कर्ष थॉमसन यांनी काढला. अशाप्रकारे इलेक्ट्रॉन या अणुमध्ये असलेल्या मूलभूत कणाचा शोध लागला. थॉमसन यांनी इलेक्ट्रॉनचे अनेक महत्वाचे गुणधर्मसुद्धा शोधून काढले.
इलेक्ट्रॉनच्या या गुणधर्मांचा वापर करून शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी अनेक लहान-मोठी उपकरणे तयार केली. १९०४ मध्ये थॉमसन यांनी अणुची संरचना स्पष्ट करण्यासाठी अणुचे प्लम पुडिंग मॉडेल प्रस्तावित केले. अणूमधील सर्वांत पहिल्या मूलभूत कणाचा शोध लावण्याचे श्रेय थॉमसन यांना दिले जाते. वायूच्या विद्युत संवहनासंबंधी केलेल्या महत्वाच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक कार्याबद्दल थॉमसन यांना १९०६ मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. ब्रिटिश सरकारने नाइट (१९०८) व ऑर्डर ऑफ मेरिट हे किताब देऊन त्यांचा गौरव केला. विद्युत चुंबकत्व व इतर विषयांसंबंधीचे थॉमसन यांचे २३० शोधनिबंध आणि १३ ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अशा या प्रतिभावान शास्त्रज्ञाचे ३० ऑगस्ट १९४० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -