घरसंपादकीयअग्रलेखसंविधानाचा सोयीस्कर कळवळा!

संविधानाचा सोयीस्कर कळवळा!

Subscribe

निवडणुका जवळ येऊ लागताच धर्मांध शक्ती डोके वर काढायला लागल्या आहेत. कोणी कितीही धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरला, लांगुलचालन केले तरी त्यांच्या मानण्या न मानण्याने आम्हास फरक पडत नाही. भारत हे हिंदूराष्ट्र होते, हिंदूराष्ट्र आहे आणि हिंदूराष्ट्रच राहील, असे घोषवाक्य असलेल्या बॅनर्समध्ये झळकणारे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या पुतळ्यासमोर हात जोडून उभे राहिल्याचे पाहून हसू आवरणे कठीण होते.

निवडणुका जवळ येऊ लागताच धर्मांध शक्ती डोके वर काढायला लागल्या आहेत. कोणी कितीही धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरला, लांगुलचालन केले तरी त्यांच्या मानण्या न मानण्याने आम्हास फरक पडत नाही. भारत हे हिंदूराष्ट्र होते, हिंदूराष्ट्र आहे आणि हिंदूराष्ट्रच राहील, असे घोषवाक्य असलेल्या बॅनर्समध्ये झळकणारे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या पुतळ्यासमोर हात जोडून उभे राहिल्याचे पाहून हसू आवरणे कठीण होते. किती हा नाटकीपणा आणि ढोंगीपणा, पण काही का असेना, एकेकाळी तथाकथित विकासाच्या गप्पा मारून सत्तेत बसलेल्या आणि सत्तेत बसण्यास इच्छुक असलेल्या देशपातळीपासून राज्यपातळीपर्यंतच्या सर्वच नेत्यांच्या तोंडी हिंदुत्वाचा हुंकार घुमायला लागला आहे. त्याअर्थाने हिंदुत्व हाच यंदाच्या निवडणुकांचा अजेंडा असणार, हे देखील आता स्पष्ट व्हायला लागले आहे.

संविधानाचे शिल्पकार, भारताचे भाग्यविधाते आणि आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून ओळखले जाते. एवढेच नाही, तर आधुनिक काळातही निरोगी संसदीय लोकशाहीसाठी भारतीय संविधान जगात आदर्श संविधान म्हणून नावाजण्यात आले आहे. भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांना सर्वोच्च स्थान आहे. या मूल्यांमुळे भारतीय लोकशाहीचा झेंडा उंच डौलाने फडकत असून त्याचा मजबूत पाया भारतीय संविधान आहे. संविधनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली.

- Advertisement -

बहिष्कृत अस्पृश्य समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या राष्ट्रप्रेमाची भावना आंबेडकरांनी रुजवली. सर्वांनी आपआपला धर्म पाळला पाहिजे, मात्र इतरांच्या धर्माचाही आदर केला पाहिजे. असे, करत असतानाच धर्मावरून तेढ निर्माण होता कामा नये. धार्मिक भेदभावातून देशात फूट पडता कामा नये, अशी शिकवण डॉ. आंबेडकर यांनी दिली. व्यक्तिपूजेला विरोध करतानाच मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीयच आहे. जात, धर्म, प्रांत आणि भाषेपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे, या विचारातून डॉ. आंबेडकर राष्ट्रप्रेमाची शिकवण देत होते.

डॉ. आंबेडकर राजकीय लोकशाहीचे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत परिवर्तन व्हावे, यासाठी आग्रही होते. संविधानाच्या पायावर उभ्या राहिलेल्या लोकशाही प्रणालीतून त्यांना या देशातील लोकांच्या जीवनात सामाजिक व आर्थिक स्तरावरसमानता आणायची होती. हे अमूलाग्र परिवर्तन घडवून आणताना फक्त निवडणुकीत लोकांना मताधिकार मिळाला म्हणून तेवढ्याने यशस्वी लोकशाही साकार होईल, असा भाबडा आशावाद त्यांच्या मनात नव्हता. देशात लोकशाहीची स्थापना करताना धर्म-पंथ आणि जातीसमूह या गोष्टी राजकारणात आल्यास त्या लोकशाहीस मारक ठरतील, हेही त्यांना पक्के ठाऊक होते. या देशात अनादी काळापासून जातीभेदाचे सामाजिक वास्तव अस्तित्वात असून ते लोकशाहीच्या तत्त्वांना मारक असल्याचे त्यांचे चिंतन होते. राजकारणातील आत्यंतिक व आंधळ्या भक्तिभावामुळे लोकशाहीचे तत्त्व पायदळी तुडवले जात असल्याचे लोकांच्या लक्षातही येत नाही. राजकीय पक्ष त्यांच्या स्वार्थासाठी धर्माचा किंवा जातसमूहाचा गैरपणे वापर करत असल्याचे लोकांना उमगतच नाही. पक्षनिष्ठेच्या भूमिकेतून ते त्यासंबंधीचा प्रचंड अभिनिवेश मनात बाळगून असतात.

- Advertisement -

सध्या घडीला देशात धर्मवाद विरुद्ध धर्मनिरपेक्षता असा संघर्ष उभा केला जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या संघर्षासाठी सैनिक तर लागणारच त्याअनुषंगाने समाजमनही घडवले जात हा इशारा गांभीर्याने लक्षात घेण्याची गरज आहे. पक्ष शे दोनशे आमदार, खासदार निवडून येणारा असो की एका आमदाराच्या जीवावर उडणारा प्रत्येक राजकीय पक्ष आपली तत्त्वप्रणाली ही देशापेक्षा मोठी आहे, असाच व्यवहार करताना दिसत आहे. याच विचारसरणीच्या आधारे समजा एखाद्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले, तर त्यातून डॉ. आंबेडकरांनीच म्हटल्याप्रमाणे- देशात लोकशाही आपले बाह्यरूप सांभाळेल, परंतु प्रत्यक्षात ती हुकूमशाहीला प्रोत्साहन देईल. याचीच शक्यता वास्तवात येण्याचा धोका अधिक मोठा आहे. हे वास्तव आज बर्‍याच अंशी लोकांच्या प्रत्ययास येत असले, तरी अजूनही अंधभक्तीच्या आहारी गेलेल्यांच्या हे वास्तव शेकडो मैल दूर आहे.

संविधानाचे आम्हीच रक्षणकर्ते आहोत, असा आव आणणारे सत्ताधारी संविधानावर घाव घालण्याची संधीच शोधत असताना विरोधकांचेही अवसान गळून पडले आहे. अदानी, जेपीसी आणि अशा बर्‍याच मुद्यांवर विसंवाद झाल्यानंतर परवा शरद पवारांनी दिल्लीत जावून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींच्या गळाभेटी घेतल्या. या भेटीत लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र लढणार आहोत. देशातील अनेक विरोधी नेत्यांशी आम्ही संवाद साधणार आहोत, असा नारा उसने आवसान आणून देण्यात आला. काही महिन्यांपूर्वी अगदी याचप्रकारे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आणि बाळासाहेबांचे नातू तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी संविधान वाचवण्यासाठी एकत्र येण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. सध्या ही युती की आघाडी थंड बस्त्यात गेल्यात जमा आहे. संविधान वाचवण्याच्या नावाखाली साप-मुंगसाचा खेळ मांडून जनतेची करमणूक चालू आहे. धर्मांध गारूडी मात्र हातात बहुमाताची काठी येण्याच्या प्रतीक्षेत शांतपणे उभा आहे.

देशाला सध्या शाहू, फुले आंबेडकरांचे विचार तारून नेतील, धर्मांध शक्ती डोके वर काढायला लागल्या असून देशाचे संविधान बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने हा प्रकार घातक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -