घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तो अहंकारातें दंडुनी | सकळ कामु सांडुनी | विचरे विश्व होउनी | विश्वामाजीं ||
तो मी पणा दवडून, सर्व विषय सोडून, जगदाकार होऊन जगात संचार करतो.

हे ब्रह्मस्थिति निःसीम। जे अनुभवितां निष्काम। ते पावले परब्रह्म । अनायासें ||
जे निष्काम पुरुष निःसीम ब्रह्मस्थितीचा अनुभव घेतात ते अनायसेच परब्रह्मास (आत्मस्वरूपास) प्राप्त होतात.

- Advertisement -

जे चिद्रूपीं मिळतां। देहांतीचि व्याकुळता । आड ठाकों न सके चित्ता । प्राज्ञा जया ||
जे ज्ञानस्वरूपी मिळाले असता त्या स्थितप्रज्ञाच्या चित्ताला मृत्यूची व्याकुळता प्रतिबंध करू शकत नाही.

तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति। सांगत अर्जुनाप्रति | संजयो म्हणे ||
संजय धृतराष्ट्रस म्हणतो राजा, तीच ही स्थिती श्रीकृष्णांनी स्वत: अर्जुनास सांगितली

- Advertisement -

ऐसें कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुनें मनीं म्हणितलें | आतां आमुचियाचि काजा कीर आलें | उपपत्ति इया ||
असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकल्यावर अर्जुन मनात म्हणाला की, ही युक्ति आता आमच्या बरी पथ्यावर पडली !

जें कर्मजात आघवें । एथ निराकारिलें देवें । तरी पारुषलें म्यां झुंजावें म्हणौनियां ||
कारण येथे श्रीकृष्णाने सर्व कर्माचा निषेध केला आहे, तरी पण मी युद्ध करावे म्हणून ते सांगतात.

ऐसा श्रीअच्युताचिया बोला। चित्तीं धनुर्धर उवाइला। आतां प्रश्नु करील भला। आशंकोनी ||
ह्याप्रमाणे श्रीकृष्णाचे भाषण ऐकून अर्जुन आपल्या मनात फार आनंदी झाला. आता तो शंका घेऊन पुढे गहन प्रश्न करील.

तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासी आगरु। कीं विवेकामृतसागरु। प्रांतहीनु ||
तो प्रसंग फार सुरस असून सर्व धर्माचे उत्पत्तिस्थान अथवा अमर्याद विचारामृताचा सागरच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -