Eco friendly bappa Competition
घर संपादकीय ओपेड ‘आदित्य एल-१’ भारतासाठीच नव्हे तर जगासाठीही महत्वाचे!

‘आदित्य एल-१’ भारतासाठीच नव्हे तर जगासाठीही महत्वाचे!

Subscribe

इस्रोच्या ‘आदित्य एल-१’ या मोहिमेकडून संपूर्ण जगाला आशा आहेत. कारण ‘आदित्य एल-१’ ही मोहीम केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी फायदेशीर ठरणार आहे. सूर्याच्या अभ्यासासाठीच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या ‘आदित्य एल-१’ मोहिमेद्वारे इस्रो मुख्यतः अंतराळातील सौरवादळे, तेथील तापमानवाढ आदी बाबींवर प्रामुख्याने प्रकाश टाकणार आहे. अंतराळातील घडणार्‍या या बाबींचा परिणाम पृथ्वीवर कशाप्रकारे होणार आहे, यामुळे जीवसृष्टीला आगामी काळात कोणत्या संकटांचा सामना करावा लागणार आहे, या गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे.

मिशन ‘चांद्रयान-३’च्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चंद्रानंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सज्ज झाली आहे. शनिवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता इस्रोची ‘आदित्य एल-१’ ही मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सुरू होईल. चंद्रानंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी तातडीने मोहीम सुरू करण्याचे धारिष्ठ्य दाखवत इस्रोने जगाला या माध्यमातून एक वेगळा संदेश दिला आहे. कारण, चंद्राच्या दक्षिण धुव्रावर आतापर्यंत कोणत्याही देशाच्या अंतराळ संशोधन संस्थेची मोहीम यशस्वी झाली नव्हती, परंतु याठिकाणी आपले यान यशस्वीपणे उतरवल्यानंतर इस्रोने जगभरात एक वेगळा ठसा उमटवला.

इतर प्रगतीशील देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांच्या तुलनेत आपणही काही कमी नाही, हा संदेश भारताने ‘चांद्रयान-३’च्या यशाच्या माध्यमातून दिलाच, परंतु यानंतरही भारत अंतराळ क्षेत्रात संशोधनासाठी अनेक मोहिमा राबवून जगाच्या हितासाठी काम करणार आहे, असा महत्वपूर्ण संदेश ‘आदित्य एल-१’ मोहिमेद्वारे देण्यात भारत यशस्वी झाला आहे. तसेच ‘चांद्रयान-३’ने इतर अंतराळ संस्थांच्या तुलनेत जे यश मिळविण्याचे वेगळेपण इस्रोने जगापुढे निर्माण केले आहे, त्यात सातत्य कायम राखण्यास ‘आदित्य एल-१’ मोहिमेमुळे मदत मिळणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे आपले यान उतरवल्याने संपूर्ण जगाची नजर इस्रोच्या कामगिरीवर आहे. मिशन चांद्रयान-३नंतर ‘आदित्य एल-१’ ही मोहीम यशस्वी ठरल्यानंतर इस्रो यशाचे नवे शिखर गाठणार यात काही शंका नाही.

- Advertisement -

इस्रोच्या ‘आदित्य एल-१’ या मोहिमेकडून संपूर्ण जगाला आशा आहेत. कारण ‘आदित्य एल-१’ ही मोहीम केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी फायदेशीर ठरणार आहे. सूर्याच्या अभ्यासासाठीच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या ‘आदित्य एल-१’ मोहिमेद्वारे इस्रो मुख्यतः अंतराळातील सौरवादळे, तेथील तापमानवाढ आदी बाबींवर प्रामुख्याने प्रकाश टाकणार आहे. अंतराळातील घडणार्‍या या बाबींचा परिणाम पृथ्वीवर कशाप्रकारे होणार असून यामुळे जीवसृष्टीला आगामी काळात कोणत्या संकटांचा सामना करावा लागणार आहे, या गोष्टींचा अभ्यास करणार आहे.

जागतिक तापमानवाढ ही सध्या संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब बनली आहे, यात काही शंका नाही. जागतिक तापमानवाढीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अनेक देश एकत्ररित्या कामही करत आहेत, परंतु जागतिक तापमानवाढीच्या समस्येला तोंड देतानाच आगामी काळात जर सौरवादळांमुळे होणार्‍या संकटानांही आपल्याला तोंड द्यावे लागले तर यासाठी पूर्वतयारी करणे फार गरजेचे आहे. भविष्यात सौरवादळांमुळे कधीतरी सूर्याचे तापमान वाढून त्याचा परिणाम पृथ्वीवर पडू लागला, तर त्यावर नियंत्रण ठेवणे आपल्या हातात राहणार नाही, मात्र ‘आदित्य एल-१’ सारख्या मोहिमांमध्ये होणार्‍या अभ्यासातून वादळांची पूर्वसूचना पृथ्वीवासीयांना मिळेल. त्यामुळे यापासून बचावासाठीच्या उपाययोजनाही करता येतील.

- Advertisement -

शनिवारी २ सप्टेंबरला सकाळी ११.५० मिनिटांनी इस्रो जेव्हा ‘आदित्य एल-१’ सूर्याच्या दिशेने सोडेल, तेव्हा संपूर्ण जगाची नजर याकडे असेल. सूर्याच्या संस्कृतमधील शेकडो नावांपैकी एक, आदित्य हे नाव या मोहिमेला इस्रोकडून देण्यात आले आहे. ‘आदित्य’ हे अंतराळयान एल-१ या बिंदूवरून सूर्याचा अभ्यास करणार असल्याने मोहिमेचे नाव ‘आदित्य एल-१’ असे ठेवण्यात आले आहे. सौर अभ्यासासाठी आदित्य एल-१ ला पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेने सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरापर्यंतचा प्रवास करावा लागणार आहे. १५ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या पहिल्या टप्प्यावर एल-१ म्हणजेच लँगरेंज-१ पॉईंटपर्यंत आदित्य एल-१ यानाला पोहोचायचे आहे.

आदित्य एल-१ सूर्याभोवतीच्या या कक्षेत प्रवेश करेल आणि तिथून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत घालत आपला अभ्यास सुरू करेल. अंतराळातील तारे, ग्रह, उपग्रह इत्यादींमध्ये गुरुत्वाकर्षण असते. या दोन वस्तूंमधील काही बिंदू असे असतात की तेथे दोन्हींचे गुरुत्वाकर्षण समतोल म्हणजेच समसमान असते. अशा बिंदूंना खगोलशास्त्राज्ञांच्या भाषेत लँगरेंज पॉइंट असे संबोधले जाते. इटालियन संशोधक जोसेफ लुई लँगरेंज यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे. सूर्य आणि पृथ्वीदरम्यान आतापर्यंत असे पाच बिंदूू खगोल अभ्यासकांना सापडले असून त्यांना एल-१, एल-२, एल-३, एल-४ आणि एल-५ अशी नावे देण्यात आली आहेत. लँगरेंज पॉईंट या अशा जागा आहेत ज्या सूर्य आणि पृथ्वी या दोहोंच्यामध्ये असून या पॉईंट्सवरून सूर्याला कोणत्याही ग्रहण किंवा अडथळ्यांशिवाय स्पष्टपणे पाहता येऊ शकते.

महत्वाचे म्हणजे येथे गुरुत्वाकर्षण केंद्राभिमुख बलाच्या समसमान असते. त्यामुळे कोणतेही अंतराळ यान या केंद्रावर थांबून अगदी कमी इंधनात सूर्यावर संशोधन करू शकते. म्हणूनच इस्रो ‘आदित्य एल-१’द्वारे सर्वात प्रथम लँगरेंज-१ पॉईंटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. येथे पोहोचल्यानंतर इस्रोचे मिशन ‘आदित्य एल-१’ हे यशस्वी होईल आणि त्यानंतर सौर अभ्यासाच्या प्रवासाला सुरुवात होईल. आपल्याला दिसणारा सूर्याचा भाग म्हणजेच अंतराळ शास्त्रज्ञांच्या भाषेत सन फोटोस्फियरचा अभ्यास ‘आदित्य एल-१’द्वारे करण्यात येणार आहे. तसेच सूर्याच्या बाह्य वातावरणाचा म्हणजेच क्रोमोस्फियर आणि सूर्यापासून काही हजार किलोमीटर वरचा बाह्य स्तर म्हणजेच अंतराळ शास्त्रज्ञांच्या भाषेतील कोरोना लेयर यांच्या चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट ‘आदित्य एल-१’द्वारे निर्धारित करण्यात आले आहे. यासोबतच अंतराळातील सौरवादळे, क्रोमोस्फियर आणि कोरोनाची गतिशीलता, सूर्याचे तापमान, कोरोनाचे तापमान, कोरोनल मास इजेक्शन आदी बाबींचाही आढावा ‘आदित्य एल-१’ मोहिमेद्वारे घेण्यात येणार आहे.

आतापर्यंत केवळ अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा, युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) आणि जर्मन एरोस्पेस सेंटरने (जीएसी) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अतंराळ मोहिमा सुरू केल्या आहेत. मार्च १९६० मध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पहिली मोहीम नासाने हाती घेतल्याचा इतिहास आहे. त्यानंतर सलग ३ याने नासाने सूर्याकडे पाठविल्याची नोंद आहे. एसओएचओ (सोलर अँड हेलिओस्फेरिक ऑब्झर्व्हेटरी), पार्कर सोलर प्रोब (पीएसपी) आणि आयआरआयएस (इंटरफेस रीजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ) या तीन मोहिमा नासाने सूर्याच्या अभ्यासासाठी केल्या आहेत. त्यानंतर १९७४ साली युरोपने सूर्याच्या अभ्यासात प्रथमच उडी घेतली.

त्या वर्षी जर्मनीची अंतराळ संशोधन संस्था जर्मन एरोस्पेस सेंटरने (जीएसी) आणि नासाने संयुक्तपणे मोहीम यशस्वी केली. तेव्हापासून ते आतापर्यंत किमान १५ मोहिमा राबविल्या गेल्याचा इतिहास आहे. त्यातील काही यानांचे काम अद्याप सुरू आहे. यातील बहुतांश मोहिमा या नासाने आणि युरोपातील अंतराळ संशोधन संस्थांनी संयुक्तरीत्या पार पाडल्या आहेत. फेब्रुवारी २०२० मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीने (ईएसए) स्वबळावर सूर्यमोहीम राबविली. आता भारत या मोजक्या देशांच्या पंगतीत जाऊन बसणार आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीचे यान तयार करून सूर्यावर स्वारी करणारा भारत हा अमेरिकेनंतरचा पहिला देश ठरणार आहे. म्हणूनच इस्रोचे कौतुक करावे तितके कमीच.

एसओएचओ (सोलर अँड हेलिओस्फेरिक ऑब्झर्व्हेटरी) मोहीम नासा आणि जर्मन एरोस्पेस सेंटरने (जीएसी) संयुक्तपणे राबविली होती. सगळ्यात जास्त चाललेल्या उपग्रहांपैकी हा एक आहे, तर पार्कर सोलर प्रोब (पीएसपी) चार वर्षांपासून सूर्याच्या पृष्ठभागाच्या सगळ्यात जवळ जाऊन उड्डाण करत आहे. तो सोलर कोरोनाच्या जवळ जाऊन पोहोेचल्याचीही नोंद आहे, तर आयआरआयएस (इंटरफेस रीजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ) सूर्याच्या पृष्ठभागाची उच्च सर्वोत्तम छायाचित्रे घेत आहे. प्रत्येक अंतराळ मोहीम ही इतर मोहिमांपेक्षा १०० टक्के वेगळी असू शकत नाही, पण काळाबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानात वेगाने विकास होत आहे. जर एखाद्या देशाने १० वर्षांपूर्वी एखादी मोहीम राबवली असेल, तर त्यावेळचे तंत्रज्ञान आणि आजचे तंत्रज्ञान यामध्ये खूप फरक आहे.

त्यामुळे इतक्या वर्षांच्या अंतरानंतर जरी सौर अभ्यासासाठी भारत सुरुवात करत असला तरी जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांकडून याचे स्वागतच केले जात आहे. तंत्रज्ञानाच्या फायद्यांच्या बाबतीत प्रत्येक मोहीम त्याआधीच्या मोहिमांपेक्षा वेगळी असल्याचे आत्तापर्यंतच्या संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे जर भारताने इतर देशांच्या मोहिमांवर अवलंबून न राहता स्वतःची मोहीम स्वतंत्रपणे राबवली, तर या मोहिमेत निर्माण होणारे संभाव्य अडथळे सोडवण्यासाठी भारताला इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहावे लागणार नाही. भारताला स्वतंत्र मोहिमेचा अनुभवही मिळेल. भारत अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भर आहे, हा संदेशही या माध्यमातून जगाला जातो आहे. ‘आदित्य एल-१’ ही मोहीम सूर्याला समजण्यासाठी एक सुरुवात आहे. सूर्याचा आवाका पाहता त्याला समजून घेण्यासाठी आणखी अनेक मोहिमा हाती घ्याव्या लागतील, यात काही शंका नाही.

रामचंद्र नाईक
रामचंद्र नाईकhttps://www.mymahanagar.com/author/ramchandra/
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
- Advertisment -