घरसंपादकीयओपेडइस ‘बॉयकॉट’ को मार डालो...

इस ‘बॉयकॉट’ को मार डालो…

Subscribe

चित्रपट बॉयकॉट करण्यासाठी कुठलीही कारणे पुरेशी असतात. आज कारणे शोधली जातात, बनवली जातात. अतुल कुलकर्णीच्या ‘नटरंग’ चित्रपटात गना कागलकर तमासगीर मंडळींना म्हणतो, ‘इतकं बारकं पाईल्यावर बाईलाबी मिशा दिसत्यात’. बारिक पाहिल्यावर जगणं कठिण होईल. आज कुठल्याही कलाकृती, नाटकात, लेखनात, अगदी रोजच्या जगण्यातही आपल्या धार्मिक आणि जातीय भावना दुखावण्याला कारण ठरवता येतील, अशा अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असतात. मात्र त्या सहेतूक नसतात, आपणच आपल्या ठरवूनच भावना दुखावायच्याच म्हटल्यावर कारणं शोधणं फार कठीण नसतं. ती शोधून बॉयकॉटची मोहीम राबवणे घातक आहे. त्यामुळे इस बॉयकॉट को मार डालो, असे म्हणायची वेळ आली आहे.

शोले रिलिज होऊन ४७ वर्षे झाल्यावर आज या सिनेमालाही बॉयकॉट करण्याची टूम काढण्यात आली. शोलेतले अनेक प्रसंग आहेत. सोशल मीडिया आज ‘सोसना माझिया’ झालाय, ‘इतना सन्नाटा क्यूं है भई’ म्हणणारा शोलेतला रहिम चाचा आज बॉयकॉटचं पहिलं कारण ठरेल, कसं ते आपल्या धार्मिक, जातीय बिघडलेल्या जाणिवा सूक्ष्मदर्शकात बसवून ‘बारिकतेने’ बघूयात…रहिम चाचाचा मुलगा अहमदला मारून गब्बर घोड्यावरून रामगढला पाठवतो, त्यावेळी चाचा म्हणतो, मुझे और दो चार बेटे क्यूँ नही दिए…इस गाँव पर शहीद होने के लिए, वरवर पाहता हे वाक्य मोठं समर्पणाचं वाटतं, मात्र त्यात लबाडी आहे. रहिम चाचानं आपला तरुण मुलगा गमावलेला आहे. आता त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे त्याच्या वाट्याला जे दुःख आलेलं आहे.

तेच इतरांच्या वाट्याला यावं, म्हणून रामगढवासियांचा विरोध असतानाही जय आणि विरूने रामगढमध्येच राहावं, असा कटकारस्थानी विचार या रामगढमधल्या ‘मौलाना’चा यामागे आहे. कारण सरळ आणि स्पष्ट आहे. रहिम चाचा मौलाना मुसलमान आहे. तर रामगढमधले गावकरी हिंदू असावेत, ‘रामगढ के हर आँगन में मौत नाचेगी’ हे गब्बरने लिहलेलं पत्र खरतंर मौलाना चाचाच्या मनातली सुप्त इच्छा असल्याचा साक्षात्कार आज सोशल मीडियावर व्हायला हरकत नाही. याच सिनेमात दुसर्‍या एका प्रसंगामुळे धार्मिक भावनांची लाहीलाही होईल. श्री भोले शंकराच्या मूर्तीमागे लपून विरू बसंतीला साक्षात भोलेनाथाची दैववाणी ऐकवण्याचा प्रसंग हा सरळ सरळ धार्मिक भावनांना दिलेलं आव्हान आहे. चित्रपटाच्या नायिकेवर प्रभाव पाडण्यासाठी नायकाकडून साक्षात देवाच्या मूर्तीचा होणारा वापर आक्षेपार्ह आहे.

- Advertisement -

आता सोहनी महेवालकडे वळूयात, ‘मिट्टी के लिए मेरी सोहनी को मत बेचो’ असं महेवाल झालेला सन्नी म्हणतो, सोहनीची एवढी काळजी असलेला प्रेमासक्त महेवाल ‘बोल दो मिठे बोल सोणिये..’ गाण्यात मात्र धार्मिक भावना कमालीच्या दुखावतो, ‘नाम खुदा के ले जरा…सबक शुरू कर बिस्मिलाह’ परमेश्वराच्या नावाने पहिला धड्याच्या शिकवणीनंतर महेवाल पुढे जे म्हणतो ते कमालीचं आक्षेपार्ह आहे. तो म्हणतो, जी करता है तेरे जैसे बुत एक बनाऊं…सजदे उसके कर कर के मै आज मुसलमाँ से काफिर हो जाऊँ…अरे सोणिये, याचा सरळ सरळ अर्थ ‘ मला असं वाटतंय कि आता तुझी मूर्ती बनवून मी त्याची उपासना करावी, मग मी काफिर झालो तरी हरकत नाही, हा धर्मापासून केलेला थेट विद्रोह आहे. आजच्या काळात आनंद बक्षी साहेबांनी गाणं लिहिलं असतं तर त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याची सोय झाली असती.

नागराज मंजुळे नावाचा एका माणसानंही असाच गुन्हा केलेला आहे. फँड्रीमध्ये फँड्रीतल्या जब्या आणि त्याच्या कुटुंबानं मारलेलं डुक्कर गाडगे बाबा, डॉ. आंबेडकरांच्या भीत्तीचित्रांसमोरून काठीला बांधून नेलं जातं, त्यावेळी जातीय भावना दुखावल्या नसल्याची ओरड आज करता येऊ शकते, मात्र आंबेडकरी समुदाय सामाजिक प्रगल्भतेच्या दृष्टीने थोडाफार सजग असल्यानं हे शक्य होणार नाही. नाना पाटेकरनं क्रांतीवीरमध्ये दगडाने बोट ठेचून हिंदू आणि मुसलमान यांच्या रक्ताच्या रंगात नसलेला फरक शोधण्याचा केलेला प्रयत्न नव्वदच्या दशकात हिट ठरला होता. त्यानंतर नानानं गुलाम ए मुस्तफा नावाचा सिनेमा केला. या चित्रपटाचं नाव आधी केवळ मुस्तफा होतं, मात्र त्यावरून धार्मिक भावना दुखावल्यानं गुलाम ए…अशी त्याला सुरुवातीला जोड देण्यात आली. भावना दुखायला कारणं शोधण्याची गरज नसावी, सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या आणि संजय रावलांनी दिग्दर्शित केलेला नव्वदच्या दशकातलाच वजीर सिनेमा आठवावा, यात विक्रम गोखलेंच्या व्यक्तीरेखेचे नाव पुरुषोत्तम बाबासाहेब कांबळे असावं, चक्क गोखले नावाचा अभिनेता कांबळे नावाचं पात्र करतोय, हे आज निषेधार्ह आहेच.

- Advertisement -

असाच द्रोह उपेंद्र लिमयेनं कोकणस्थमध्ये गौतम पगारे या नावानं केल्यानंतरही धार्मिक भावना दुखावल्याची ओरड झाली नाही. आदिवासी दलित लहान्या (ओम पुरी) ला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणारा गोविंद निहलानींच्या ‘आक्रोश’ मधला भास्कर कुलकर्णी नावाचा वकील तर चक्क नसिरुद्धीन शहांनी साकारला होता. या भास्कर कुलकर्णीवरून ऐंशीच्या दशकात वाद झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र अलिकडच्या काळात अफझलखानाचा वध आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या नावांच्या मुुद्यावरून धार्मिक आणि जातीय भावना सहज दुखावल्या गेल्याची उदाहरणे आहेत. दोन्ही मुद्दे संदर्भाच्या विषयावरून गैरलागू असले तरी नावातील सार्धम्यामुळेही ‘आक्रोश’ रिलिज झाल्यावर त्याविषयी अन्यायाचा प्रतिकार करणार्‍या नायकासाठी ‘हेच नाव का घेतले’ अशा वादाचे एकही उदाहरण त्या काळात घडल्याची शक्यता नाहीच. थोडक्यात त्या काळातील प्रेक्षक आजच्या इतके सूज्ञ आणि सतर्क नसावेत.

के आसीफच्या ‘मुघल-ए-आझम’मध्ये ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे…’ म्हणणारी मधुबालाची अनारकली आज ‘नंदलाला’चं गाणं पडद्यावर दाखवलं म्हणून बॉयकॉट झाली असती. हिंदी पडद्यावर मराठी व्हिलन दुर्मिळच, मात्र खलनायकांची नावे मराठी माणसाची असल्याचं शोधून बॉयकॉट करण्याची मराठी अस्मिता राखण्यासाठी आज संधी आहे. अधिकारी ब्रदर्सचा भूकंपमधला दया पाटील, महेश भट्टच्या ठिकानातला एम पी राणे, अलिकडचंच उदाहरण द्यायचं तर रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’चित्रपटातील जयकांत शिखरे किंवा ‘सिंबा’मधल्या दुर्वा यशवंत रानडे ही मराठी खलनायकांची नावे आपण कशी सहन केली? बॉयकॉटची ही चालून आलेली संधी होती, जी आपण घालवली.

मराठी ग्रामपटातील तमाशाप्रधान चित्रपटांमध्ये अत्याचारी पाटील होता. मात्र त्या विषयावरून कधीही जातीय आंदोलनं, जातीय भावना दुखावल्याचा प्रकार त्या काळात घडला नव्हता. सिनेमे बॉयकॉट करण्याची कारणे ही धार्मिक मद्यांपेक्षा राजकीयच आहेत. विशिष्ट धर्म समुदायातील कलाकारांचे सिनेमे बॉयकॉट करून हिंदी चित्रपटक्षेत्रातील त्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. त्यासोबतच साऊथच्या सिनेमांचे आक्रमण हासुद्धा हिंदी पडदा अडचणीत आणण्यासाठी कारण ठरत आहे. आमिर खानचा लालसिंह चढ्ढा हे त्याचे अलिकडचे उदाहरण. जातीय, धार्मिक विभाजनाचा संसर्ग आजपर्यंत हिंदी सिनेक्षेत्रात झालेला नव्हता. म्हणूनच युसूफ खान नावाचा मोठा कलावंत संवादाचा बादशहा म्हणून दिलीप कुमार झाला. तर मूळ दिलीप कुमार नाव असलेला पुढे ए. आर. रेहमान हा संगीतकार नावारुपाला आला. ही दोन नावे दोन वेगवेगळ्या काळातल्या दोन दिग्गजांची आहेत.

मात्र या अशा बदलामुळे सिने इंडस्ट्रीला कधीही फरक पडत नव्हता, तसाच प्रेक्षकांनाही फरक पडत नव्हता, त्यांना कलेशी आणि कलाकाराच्या अभिनय, संगिताशी देणेघेणे होते. त्याच्या जात धर्माशी किंवा उपासना पद्धतीशी नाही. अलिकडच्या आठ दहा वर्षात धार्मिक उन्मादाचे विष हिंदी चित्रपट क्षेत्रातही पसरू लागले आहे. एक काश्मिर फाईल्स रिलिज झाल्यावर गोध्रा हत्याकांडावरील सिनेमाचा विषय समोर आणणे हे सिने इंडस्ट्रीत पडलेल्या गटवादाचे प्रातिनिधीक स्वरुप आहे. अलिकडेच अनुपम खेरनं केलेलं भाष्य महत्वाचं आहे. तो म्हणाला आज मला यशराज, करन जोहरच्या सिनेमात काम मिळणं दुर्मिळ झालंय…यावरून चित्रपट क्षेत्रात सरळ सरळ दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं आहे.

अमिर खानचा ‘लालसिंह चढ्ढा’ बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरल्यावर चित्रपट बॉयकॉटचे दुष्परिणाम नव्याने समोर येत आहेत. चित्रपटाचा लेखक अतुल कुलकर्णीनं याबाबत सूचक विधान केलं, तो म्हणाला ज्यावेळी आपण अपयशाचा जल्लोष करतो, त्यावेळी आपली दिशा चुकण्याची भीती असते, लाल सिंह चढ्ढाच्या अपयशात बॉयकॉटचा वाटा मोठा असेल तर हिंदी पडद्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. सेन्सॉरचे अधिकारही निकालात निघाल्याचं हे द्योतक आहे. कोणीही कुठल्याही विषयावर भावना दुखावल्याची तक्रार केल्यावर बॉयकॉट ट्रेंड चालवल्यास सिने इंडस्ट्रीवर आपल्या घराची चूल पेटवणार्‍या छोट्या मोठ्या कलाकार आणि तंत्रज्ञांनाही त्याचा मोठा फटका बसणार आहे. मात्र याहून मोठा धोका महाराष्ट्राला आहे. मुंबईतून बॉलिवूडचं बस्तान संपुष्टात आणण्यासाठीच्या दिशेने पडलेली ही पावले आहेत.

राही मासूम रजा यांनी बी आर चोप्रांच्या महाभारताचे संवाद लिहिले होते. त्यावेळी रजा यांना त्यांच्या ‘नावामुळे’ हे जमेल का, असा प्रश्न चोप्रांसमोर अनेकांनी उभा केला होता. चोप्रांनी ही बाब रजा यांना सांगितली आणि म्हणाले, लोक असा विचार करताहेत, आता पडद्यावरच्या महाभारताचे संवाद तुम्हीच लिहायचे हे मी पक्क ठरवलं आहे. आपल्याला त्यांना खोटं ठरवायचं आहे. महाभारताच्या यशात रजा यांचा सिंहाचा वाट आहे. आशुतोष गोवारीकरनं ‘लगान’ बनवताना जावेद अख्तर यांना गाणी लिहिण्यासाठी सुचवलं, यात श्रीकृष्णाच्या संदर्भावर दोन गाणी होती, त्यातलं एक भजन होतं, राधा कैसे ना जले आणि ओ…पालनहारे ही दोन्ही गाणी जावेद अख्तर यांनी लिहली, ही गाणी लिहिण्यासाठी मला साक्षात श्रीकृष्णानेच आशीर्वाद दिला असावा, असा उल्लेख अख्तर यांनी केला होता. सत्तरच्या दशकातलं ‘गोपी’ सिनेमातलं सुख के सब साथी दुख में ना कोई…हे राम भजन महम्मद रफी साहेबांनी गायलं होतं. तर पडद्यावर दिलीप कुमार म्हणजेच युसूफ खान होते, सोबत सायरा बानो होत्या. या गाण्याचे गीतकार शकील बदायुनी तर संगीत कल्याणजी आनंदजी आणि हाशीम खान यांनी दिलं होतं. राम भजनाशी जोडलेली ही मुसलमान नावे पाहता आज हे गाणं बॉयकॉट करायला हरकत नाही.

मनमोहन देसाईंच्या ‘कुली’ मध्ये अमिताभ बच्चन इक्बाल झाला होता. ‘अमर अकबर अँथोनी’त गोल टोपी घातलेला अकबर ऋषी कपूर आवडून झाल्याला आता चार दशकं उलटली. ‘ठाकरे’ सिनेमात पडद्यावर नवाजुद्दीनने बाळासाहेबांना जिवंत केलं. मनमोहन देसाईंच्या धार्मिक आणि सामाजिक ऐक्याच्या भावनिक कथानकांमुळे ‘अमर अकबर अँथनी’ किंवा ‘नसीब’सारख्या चित्रपटात आजच्या काळात त्यावर नक्कीच बंदी आणली गेली असती. मात्र केवळ कलाकारांचे जात, धर्म पाहून त्यांच्या सिनेमांवर बहिष्कार घालण्याचा हा प्रकार एका मोठ्या सिनेपरंपरेला घातक ठरणार आहे. धार्मिक आणि सांप्रदायिक पायावर राजकारण उभे करणार्‍यांपासून सिनेइंडस्ट्रीनं लांबच असायला हवं, तेच त्यांच्या आणि प्रेक्षकांच्याही हिताचं आहे.

–संजय सोनवणे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -