घरसंपादकीयओपेडभटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली माणसांनी जगायचं कसं!

भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली माणसांनी जगायचं कसं!

Subscribe

सध्याच्या घडीला ३६ टक्के नागरिकांचा मृत्यू हा रेबीजमुळे होत असल्याची नोंद आहे, भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत आत्ताच कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना न झाल्यास भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या भविष्यात आणखी वाढेल. म्हणूनच भटके कुत्रे महत्वाचे की माणसे, याचा विचार प्रकर्षाने करण्याची वेळ आली आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या ही गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून हा मुद्दा इतका संवेदनशील आहे की, ब्रिटिश काळात यामुळे दंगलदेखील झाली होती.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात माणसे मृत्युमुखी पडणे, हे आता काही नवीन राहिलेले नाही. रोज मरे त्याला कोण रडे, या म्हणीप्रमाणेच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात माणसे मृत्युमुखी पडण्याचा विषयही तसाच सर्वसाधारणपणे चर्चिला जातो. कोणालाही या विषयाचे गांभीर्य नाही. कटू असले तरी ते सत्य आहे. कारण, जगातील सर्वाधिक भटक्या कुत्र्यांची संख्या ही भारतात असून येथील ३६ टक्के नागरिकांचा मृत्यू हा रेबीजमुळे होत असल्याचा अहवाल ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ने दिल्यानंतरही भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी कसोशीने प्रयत्न होताना दिसत नाहीत. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळेच रेबीजचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्यामुळे अनेकांचे आत्तापर्यंत बळी गेले आहेत, परंतु त्यानंतरही मनुष्याच्या मृत्यूपेक्षाही अनेकदा महत्व दिले जाते ते भटक्या प्राण्यांच्या संरक्षणाला.

त्यामुळेच की काय, आत्तापर्यंत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात इतक्या मोठ्या प्रमाणात माणसे मृत्युमुखी पडल्यानंतरही हा विषय गांभीर्याने घेतला गेलेला नाही. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली किंवा या हल्ल्यात कुणाचा मृत्यू झाला तर काही काळासाठी हा विषय चर्चेला येतो, परंतु त्याचा शेवट भटक्या कुत्र्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याने नाही तर त्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठीचे प्रयत्न पुन्हा नव्याने सुरू होतात आणि येथेच हा विषय संपतो. शेवटी काय पालथ्या घड्यावर पाणी. यातून उत्तर काही निघत नाही. परिस्थिती पुन्हा जैसे थे. कितीही निर्बिजीकरण केले तरी भटक्या कुत्र्यांची संख्या ही काही कमी झाल्याचे आत्तापर्यंत तरी ऐकिवात नाही. याउलट ती कितीतरी पटीने वाढल्याचीच नोंद होत असून भटक्या कुत्र्यांचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, हेच खरे वास्तव आहे.

- Advertisement -

भटक्या कुत्र्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे ‘वाघ बकरी चाय’ या नामांकित कंपनीचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे नुकतेच झालेले निधन. गेल्या काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या वेळी पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला दुखापत झाली आणि त्यांचे निधन झाले. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालेला नसला तरी त्यांच्या मृत्यूसाठी भटके कुत्रे कारणीभूत आहेत, हे नाकारता येणार नाही. पराग देसाईंसारख्या बड्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणे सहाजिकच आहे, मात्र भटक्या कुत्र्यांच्या समस्यांवर किमान आता तरी कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे.

त्या होतील की नाही, ही येणारी वेळच ठरवेल, परंतु भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त वेळीच नाही केला तर उद्या हीच समस्या आणखी गंभीर होईल, हे काही वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. नाकापेक्षा मोती जड होऊ नये म्हणून याबाबत आत्तापासूनच काळजी घेण्याची गरज आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणारे नाही. सध्याच्या घडीला ३६ टक्के नागरिकांचा मृत्यू हा रेबीजमुळे होत असल्याची नोंद आहे, भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत आत्ताच कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना न झाल्यास भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या भविष्यात आणखी वाढेल. म्हणूनच भटके कुत्रे महत्वाचे की माणसे, याचा विचार प्रकर्षाने करण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची समस्या ही आत्ताच्या काळातच वाढीस लागली आहे, असे नाही. भटक्या कुत्र्यांची समस्या ही गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून हा मुद्दा इतका संवेदनशील आहे की, ब्रिटिश काळात यामुळे दंगलदेखील घडल्याचा इतिहास आहे. १८व्या शतकात मुंबईत जेव्हा भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला होता, तेव्हा या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याचा वटहुकूमच काढला. जो भटके कुत्रे मारेल त्यास सरकारकडून आठ आणे इनामही देण्यात येत असे. यामुळे भटक्या कुत्र्यांना ठार करण्याचा नागरिकांनी सपाटा सुरू केला. रस्त्यांवरील कुत्र्यांना ठार करून अनेकजण बक्षिसे मिळवित. यामुळे रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची संख्या घटण्यास सुरुवात झाली.

अनेक ठिकाणी रस्त्यावरचे भटके कुत्रे संपले तरी बक्षिसाच्या हव्यासाने कुत्रे पकडणार्‍यांनी नागरिकांच्या अनेक पाळीव कुत्र्यांनाही पकडण्यास सुरुवात केली. त्या काळात कुत्रे पाळणार्‍यांमध्ये पारशी लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. पारशी धर्मात कुत्रा हा पवित्र मानला जातो आणि उत्तर कार्यात त्याची गरज लागते. ज्याप्रमाणे हिंदू धर्मात कावळ्याचे महत्व आहे त्याचप्रमाणे पारशी धर्मात कुत्र्याचे महत्व आहे. म्हणूनच पारशी धर्मीयांचा सुरुवातीपासूनच ब्रिटिशांच्या भटके कुत्रे ठार मारण्याच्या निर्णयाला विरोध होता, परंतु असे असले तरी भटक्या कुत्र्यांचा उच्छादच इतका होता की, पारशी धर्मीयांच्या विरोधानंतरही ब्रिटिश आपल्या निर्णयावर कायम राहिले. ब्रिटिशांच्या या निर्णयामुळे रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत होते. हा निर्णय पारशी धर्मीयांच्या काही पचनी पडला नव्हता. त्यांच्या मनात सरकारविरोधातील रोष कायम होता.

रस्त्यावरील भटके कुत्रे नाहीसे झाल्यानंतर अनेकजण बक्षिसाच्या हव्यासापोटी पाळीव कुत्र्यांना लक्ष करू लागल्यावर पारशी धर्मीयदेखील आक्रमक झाले. दारातील कुत्रे पळवणार्‍यांचा निषेध करण्यासाठी पारशी समाजाने संप पुकारला. या दिवशी त्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. त्या काळात इंग्रजांना लागणार्‍या बहुतांशी अन्नपदार्थांचा पुरवठा याच पारशी दुकानांमधून होत होता. पारशी धर्मीयांनी संप पुकारताच याचे परिणामही जाणवण्यास सुरुवात झाली. ब्रिटिशांच्या वसाहतीकडे जाणारा मालही रोखण्यात येताच ब्रिटिशांचे सैन्य आक्रमक झाले. पारशी धर्मीय, ब्रिटिशांचे सैन्य यांच्यात संघर्ष निर्माण होऊन दंगलही घडली. अनेक ठिकाणी दंगलीचे प्रकार घडण्यास सुरुवात होताच अखेरीस ही दंगल शमवण्यासाठी ब्रिटिश सरकारने कुत्र्यांना ठार मारण्याऐवजी त्यांना पकडून इतरत्र हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भटक्या कुत्र्यांना ठार न मारता त्यांना पकडून शहराबाहेर ठेवून नंतर जहाजाने इतरत्र नेऊन सोडण्यास सुरुवात करण्यात आली आणि दंगलीची धग शमली.

दंगलीची धग शमली असली तरी भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा मुद्दा हा काही कायमस्वरूपी निकालात निघाला नाही. काही दशकांनी पुन्हा या मुद्याने डोके वर काढण्यास सुरुवात केली. तेव्हा अनेकदा भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांना विजेचा शॉक देऊन ठार करण्यात येत असे, परंतु २००१ मध्ये प्राणीप्रेमी संघटनांनी प्राण्यांचे अधिकार अन् रक्षण यांसाठी चळवळ उभारली आणि कुत्र्यांना शॉक देऊन मारणे अमानुष असल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अशा पद्धतीने कुत्रे मारण्यास बंदी घातली आणि भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाला इतर उपाययोजना अवलंबण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या निर्बिजीकरणाचा पर्याय पुढे आला, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून निर्बिजीकरण होत असले तरी भटक्या कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. २०११ मध्ये भटक्या कुत्र्यांसंबंधी मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना उपद्रवी भटक्या कुत्र्यांना ठारच मारण्यास हिरवा कंदील दाखवलाही, मात्र प्राणीमित्र संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत यावर स्थगितीही आणली. त्यामुळे अद्यापही निर्बिजीकरणाशिवाय शासन दरबारी भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर अन्य उपाययोजना नाहीत. श्वानप्रेमींच्या या श्वानप्रेमामागे काही अर्थकारण दडलेले आहे का, अशीही शंका व्यक्त करण्यात येते.

भटक्या कुत्र्यांसह इतर पाळीव प्राण्यांच्या अधिकारांचा विचार करणारे अनेकजण आपल्या समाजात आहेत, परंतु मनुष्याचा विचार करणारे नाहीत, अशी खरी तर परिस्थिती आपल्याकडे सध्या आहे, असे म्हटल्यास कदाचित ते चुकीचे ठरणारे नाही. उदाहरण घ्यायचेच झाल्यास भटक्या कुत्र्यांना अन्न पुरवणार्‍यांचे घेता येईल. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना नियमितपणे अन्न पुरवण्यासाठी अनेक प्राणीप्रेमी संघटना प्रयत्नशील आहेत. त्यात चुकीचे काही नाही. त्यांचे कृत्य प्रशंसनीयच आहे, परंतु आपल्याकडे अनेक उपाशी माणसांना अन्न पुरविणार्‍यांची संख्या ही निश्चितच प्राणीप्रेमी संघटनांच्या सदस्यांच्या तुलनेत कमी आहे.

भटक्या कुत्र्यांविरोधात कारवाई होऊ नये यासाठी अनेकांकडून प्रयत्न होताना दिसतात, परंतु याच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जेव्हा एखाद्या मनुष्याचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांच्यासाठी लढणार्‍यांची संख्या ही जवळपास नगण्य आहे. म्हणूनच एकंदरीत ही परिस्थिती पाहता भटक्या कुत्र्यांचे महत्व हे मनुष्यापेक्षा अधिक असल्याचे कुठेतरी जाणवल्याशिवाय राहत नाही. आतापर्यंत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांनी जीव गमावूनही परिस्थितीत जर काहीच बदल होत नसेल, तर खरंच भटके कुत्रे हे माणसांच्या जीवापेक्षा महत्वाचे आहेत का, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

रामचंद्र नाईक
रामचंद्र नाईकhttps://www.mymahanagar.com/author/ramchandra/
गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विषयांवर लिखाण. नियमितपणे वृत्तपत्र वाचनाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -