घरमनोरंजनमुगल-ए-आझमची ५८ वर्षे

मुगल-ए-आझमची ५८ वर्षे

Subscribe

'मुगल - ए - आझम'ला प्रदर्शित होऊन ५८ वर्षे झाली आहेत. १५० चित्रपटगृहात त्याकाळी प्रदर्शित झालेल्या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात ४० लाखांची कमाई करत चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णअक्षरानं आपलं नाव नोंदवलं.

मुंबई आणि बॉलीवूडचं अतुट नातं आहे. इथल्या प्रेक्षकांचं चित्रपट आणि त्यातील कलाकारांवरही अतोनात प्रेम आहे. असाच एक ऐतिहासिक चित्रपट ५ ऑगस्ट, १९६० रोजी प्रदर्शित झाला, ज्याचं नाव आहे ‘मुगल-ए-आझम’. १९६० साली चित्रपटगृहांत झळकलेला हिंदी भाषेतील हा ऐतिहासिक चित्रपट आहे. के. आसिफ यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट तुफान गाजला आणि आजही या चित्रपटाची महती सांगितली जाते. पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे, दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट म्हणजे बॉलीवूडचा मान. मुघल इतिहासातील कथाविषयावर आधारलेल्या या चित्रपटानं दिलीप कुमार आणि मधुबाला या दोन्ही कलाकारांना भरभरून दाद मिळवून दिली.

काय आहेत या चित्रपटाची वैशिष्ट्ये?

त्याकाळी या भव्य चित्रपटाच्या निर्मितीसाठी ९ वर्षांचा कालावधी, तर १.५ कोटी भारतीय रूपये खर्च लागला. या चित्रपटाने भारतात कमालीचे व्यावसायिक यश मिळवत सर्वाधिक उत्पन्नाचा विक्रम केला. हा विक्रम ‘शोले’ या १९७५ सालातल्या हिंदी चित्रपटाने तोडेपर्यंत अबाधित राहिला. इतकंच नाही तर मुघल-ए-आझम चित्रपटातील अनेक गाणी लोकप्रिय झाली होती. आजही या गाण्यांची तितकीच लोकप्रियता आहे. जुनी पिढी असो वा नवी पिढी या चित्रपटाबद्दल माहीत नाही असे प्रेक्षक विरळाच. या ‘मुगल – ए – आझम’ला प्रदर्शित होऊन ५८ वर्षे झाली आहेत. १५० चित्रपटगृहात त्याकाळी प्रदर्शित झालेल्या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात ४० लाखांची कमाई करत चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णअक्षरानं आपलं नाव नोंदवलं. इतकंच नाही तर तोपर्यंत असा एकही चित्रपट नव्हता, ज्याचा इतका गाजावाजा करण्यात आला होता. मुंबई सेंट्रलमधील मराठा मंदिर एखाद्या नव्या नवरीप्रमाणं नटवण्यात तर आलंच होतं. शिवाय याच दिवशी रात्री ९ वाजता हत्तीवरून ‘मुगल-ए-आझम’ चित्रपटाची प्रिंट आणण्यात आली होती. इतकंच नाही तर, ‘मुगल-ए-आझम’च्या सेटची रचनादेखील मराठा मंदिरला करण्यात आली होती. त्याकाळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि अन्य नामवंत लोकांना या चित्रपटाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. ८५ ब्लॅक अँड व्हाईट आणि १५ रंगीत पडद्यावर हा चित्रपट दाखवण्यात आला.

- Advertisement -
set at maratha mandir
मुगल-ए-आझम

सुरुवातीला होती कुजबूज

सुरुवातीला चित्रपट पाहिल्यानंतर अनेक लोकांमध्ये चित्रपट चालणार नाही अशी कुजबूज होती. दिग्दर्शक के. आसिफ सोडून कोणालाही हा चित्रपट चालेल असं वाटत नव्हतं. मात्र के. आसिफ यांना हा चित्रपट चालणार असल्याचा विश्वास होता. केवळ एक आठवडा थांबा आणि चित्रपट नक्की चालणार असा विश्वास के. आसिफ यांना होता. हा चित्रपट पाहण्यासाठी श्रीलंका, पाकिस्तान आणि म्यानमारमधूनदेखील लोक आले होते. त्यावेळी ऑनलाईन बुकिंगची सोय नसल्यामुळं तीन दिवस आधीपासून लोकांनी या चित्रपटासाठी रांगा लावल्या होत्या. बऱ्याच प्रेक्षकांनी रात्रभर रांग लावून चित्रपटाचं तिकिट विकत घेतलं होतं.

दिलीप कुमार ही पहिली पसंती नाही

दिग्दर्शक के. आसिफ यांची दिलीप कुमारला सुरुवातीला पसंती नव्हती. कोणत्याही नव्या घोड्यावर डाव लावायचा नाही असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र शेवटी हा चित्रपट दिलीप कुमार यांनाच मिळाला होता. दरम्यान अभिनेत्रीसाठी पहिली पसंती ही नर्गिस होती. मात्र काही विवादामुळं नूतनकडे ही भूमिका गेली. पण सरतेशेवटी ही भूमिका मधुबालाला मिळाली आणि हा चित्रपट अजरामर झाला. तर, अकबराच्या भूमिकेसाठी पृथ्वीराज यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात सरावासाठी त्याच आवाजात बोलत असल्यामुळं त्यांच्या आवाजात तसाच बदल झाल्याचेदेखील किस्से सांगितले जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -