घरमनोरंजनआता पं. वसंतरावांची जन्मशताब्दी

आता पं. वसंतरावांची जन्मशताब्दी

Subscribe

रसिक श्रोत्यांनी स्वत:ला धन्य समजावे, अशी गोष्ट महाराष्ट्रात होत आहे. साहित्याच्या आणि संगीताच्या माध्यमातून ज्या दिग्गजांनी श्रोत्यांना समृद्ध केले, त्यात सुधीर फडके, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर यांची नावे आदराने घेतली जातात. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या दिग्गजांचे समग्र दर्शन गीतातून, साहित्यातून उलगडेल असा प्रयत्न सध्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिसत आहे. स्नेहल भाटकर यांच्याही संगीताचा आनंद या निमित्ताने घेता आला हे विशेष म्हणावे लागेल आणि आता शास्त्रीय संगीतात ज्यांनी योगदान दिले त्या पं. वसंतराव देशपांडे यांचा विसर पडणे तसे कठीणच. 2 मे पासून त्यांच्या जन्मशताब्दीला प्रारंभ होत आहे. त्यांचे चिरंजीव राहुल देशपांडे प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करून त्यांच्या आठवणी जागवतो आहेच, परंतु अभिनेत्री फैयाज, गायक पं. चंद्रकांत लिमये हे गेली अनेक वर्षे वसंतराव देशपांडे संगीत सभा या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहेत.

कट्यार काळजात घुसली या नाटकाच्या निमित्ताने फैयाज, लिमये यांना देशपांडे यांच्या सानिध्यात शिष्य आणि कलावंत म्हणून योगदान देता आले. त्यांच्या जयंतीच्या आणि स्मृतीदिनाच्या निमित्ताने या संगीत सभेने सातत्याने कार्यक्रम केलेले आहेत, पण यंदाचे वर्ष या दोन्ही कलावंतांना स्फूर्ती देणारे असणार आहे. या नातेसंबंधातील हे ऋण त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा जागवण्याचे ठरवलेले आहे. पं. देशपांडे यांची गाणी, त्यांच्या आठवणी, त्यांचा संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन असा एकत्रित अविष्कार जन्मशताब्दीच्या निमित्ताने करण्याचे ठरवलेले आहे. शुभारंभाचा प्रयोग 5 मे ला करण्यात येणार आहे. यानिमित्ताने स्मरणिकाही प्रकाशित केली जाणार आहे. जन्मशताब्दीच्या निमित्ताने वर्षभर हे कार्यक्रम केले जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -