घरमनोरंजननाट्य परिषदेतील सावळा कारभार आणि दहशतवाद रोखायचा आहे - सयाजी शिंदे

नाट्य परिषदेतील सावळा कारभार आणि दहशतवाद रोखायचा आहे – सयाजी शिंदे

Subscribe

“यहाँ का कमांडर कौन हैं?” असं सतत आपल्या गॅंगवर गुरकावणारा, प्रेयसीच्या मृत्यूने गडबडा जमिनीवर लोळणारा, मिटक्या मारत बिर्याणी खाणारा पल्लम. डाकूंच्या टोळीचा नायक. पण आपल्या टोळीतल्या आपल्यापेक्षा जास्त हुशार जॉर्जची वाक्य हुशारीने नेमक्या वेळी वापरण्याचा बेरकीपणा त्याच्या अंगी मुरलेला आहे म्हणून तो लीडर आहे. प्रसंगी हिंस्त्र होणारा लोकांचे मुडदे पाडणारा हा पल्लम आपल्या प्रेयसीप्रमाणेच उत्कृष्ट बिर्याणी बनवणाऱ्या तरुणाकडे आकृष्ट होतो आणि मग त्यातून सावरल्यावर स्वतः जाऊन त्या तरुणाच्या शर्टची बटणं लावतो. अनेक वर्ष जंगलातून आपली मोहीम राबवत पोलिसांना भिडणारा असा हा अर्क माणूस म्हणजे ‘घर बंदूक बिर्याणी’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमातला ‘पल्लम’ उभा करायला तितक्याच ताकदीचा अभिनेता लागणार होता. जो प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी साकारलेला आहे.

मराठीतून हिंदी सिनेमांना लाभलेले अनेक गुणी कलाकार हे महाराष्ट्रातल्या मातीतील नाटकातून तिथपर्यंत पोहोचलेले आहेत त्यातीलच एक नाव म्हणजे सयाजी शिंदे. एकेकाळी सयाजींनी मराठी नाटकं गाजवली होती. झुलवा, वन रूम किचन, आमच्या या घरात, सखाराम बाईंडर अशी दर्जेदार आणि तत्कालीन समाज व्यवस्थेवर बोट ठेवणाऱ्या नाटकांमध्ये सयाजी शिंदेंनी भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर मराठी सिनेमापासून हिंदी सिनेमा असा त्याचा अभिनय प्रवास झाला. एवढ्यावरच सयाजी थांबले नाही, तर दक्षिणात्य सिनेमांमध्येही त्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. आज तब्बल सहा ते सात भाषांमध्ये सयाजी शिंदे काम करीत आहे. सयाजी जेवढ्या कळकळीने आपल्या भूमिका साकारतात तेवढीच त्यांच्यामध्ये सामाजिक तळमळ पण आहे. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक भान म्हणून त्यांनी वृक्षसंवर्धनाचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रात आज जवळ जवळ ४० ठिकाणी हे काम जोरात चालू आहे. या प्रकल्पाद्वारे रस्ता रुंदीकरणांमध्ये झाडं तोडली जाऊ नयेत, याचीही आपण काळजी घेतली जाते. याकडे सयाजींचे जातीने लक्ष असते.

- Advertisement -

ज्या मराठी नाटकांनी सयाजी शिंदेंना भरभरून दिलं त्याच मराठी नाटकांशी संबंधित असलेल्या मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकांसाठी सयाजी ‘रंगभूमी नाटक समूह’ या पॅनलतर्फे उभे आहेत. त्यानिमित्त दैनिक ‘आपलं महानगर’सोबत झालेल्या चर्चेमध्ये सयाजी सांगत होते की, “मराठी नाटकांमध्ये मी कधी काम करेन, हे आता तरी मला नक्की सांगता येणार नाही. कारण मी सहा-सात भाषांच्या चित्रपटांमध्ये काम करत असल्यामुळे नाटकाच्या तालमींसाठी जो काही वेळ द्यावा लागतो, तेवढा देणं शक्य होत नाही. पण एक मात्र नक्की की, भविष्यामध्ये कमीत कमी पात्रांचं एखादा वेगळा विषय असलेलं मराठी नाटक जर मला मिळत असेल तर ते मी निश्चितच करेन.“

सयाजी आजच्या घडीला नाटकात काम करत नसले तरी, नाट्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय होण्याचे कारण विचारले असता सयाजींनी एकूणच नाट्यव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांबद्दल खंत व्यक्त केली आणि स्वतःची भूमिका मांडताना म्हटले की, “सिनेमापेक्षाही नाटक माणसाच्या मनावर जास्त परिणाम करते. अशी कित्येक नाटकं आतापर्यंत होऊन गेलीत, जी समाजाचा आरसा आहेत. वेळप्रसंगी त्यांनी संबंधित व्यवस्थेला देखील आरसा दाखवलेला आहे आणि व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. ही जिवंत कला आज दुर्लक्षित व्हायला लागलेली आहे, त्यासंदर्भात ठोस काम करण्याची माझी इच्छा आहे. नाट्य परिषदेच्या निवडणुकीला उभे राहण्याचे कारण म्हणजे तिथे बराचसा सावळा गोंधळ आहे, दादागिरी आहे, हुकूमशाही पण आहे. त्यामुळे त्यातला हाच दहशतवाद रोखायचा आहे.

- Advertisement -

मुळात म्हणजे नाट्य परिषदेचा मेंबर हाच मोठा सावळा गोंधळ आहे. त्यामध्ये विनाकारण राजकारण पण यायला लागलेलं आहे. माझं असं मत आहे की, नाटक ही महाराष्ट्राच्या मातीतली ओरिजिनल कला आहे, जी इतर कुठे एवढ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध नाही. ती आपण जपली पाहिजे. त्यासाठी सभासद कसे करावेत, खेडेगावापासून महाराष्ट्रभर सगळ्यांचे नाटकांचे प्रयोग व्हावेत, त्यासाठी सकारात्मक राजकारण कसं असावं यावर मला काम करायचा आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासारखा चांगला रंगमंच का सतत बंद पडतो ?… काय कारण आहे त्यामागे?… नाट्यगृहांची परिस्थिती फार वाईट आहे. त्याची काळजी घ्यायला नको का?… त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सकडून चांगली काम करून घेतली पाहिजेत. नाट्यकलेशी संबंधित प्रश्नांना सरकार दरबारी न्याय कसा मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे. आमचं पॅनल या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणार आहे.”

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या निवडणुका येत्या सोळा तारखेला पार पडणार असून, त्यात ‘आपलं पॅनल’ विरुद्ध ‘रंगभूमी नाटक समूह पॅनल’ असा जंगी सामना रंगणार आहे. यापैकी कोणाचं पारडं जड आहे, हे काळच ठरवेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -